रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्या खाताना तोंड वाकडं करताय, मग ‘ही’ रेसिपी नक्की ट्राय करा

अनेकांना जेवण करताना चपाती, भाजी ही हवीच असते. चपाती खाल्ल्याशिवाय काहींचे पोट भरत नाही. यामुळे घरातल्या गृहिणी कायमच जास्त चपात्या करतात. पण अनेकदा या चपात्या संपत नाही. त्या तशाच राहतात आणि शिळ्या होतात. शिळी झालेली चपाती कोणीही खायला मागत नाही. मग या चपात्यांचे काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. जर तुमच्याही घरातच अशाप्रकारे शिळी चपाती उरली असेल आणि कुणी खात नसेल तर तुम्ही उरलेल्या चपातीचा वापर करुन खुसखुशीत, खमंग बाकरवडी बनवू शकता. यामुळे तुमच्या चपात्याही वाया जाणार नाही आणि पोटंही भरेल.

चपातीपासून बाकरवडी बनवण्याची कृती अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला घरात नियमित वापरत असलेले साहित्य लागणार आहे. शिवाय यासाठी कृतीही फारच सोपी आहे. चपातीपासून बनवलेल्या बाकरवड्या तुम्ही चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता.

साहित्य

  • उरलेल्या चपात्या – 4 ते 5 चपात्या
  • हिरव्या मिरच्या – 4 ते 5 मिरच्या
  • आलं – 2 लहान तुकडे
  • लसूण – 6 ते 7 पाकळ्या
  • बेसन – 1 कप
  • पाणी – गरजेनुसार
  • हळद – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • लाल मसाला – 1 टेबलस्पून
  • गरम मसाला – 1 टेबलस्पून
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • चिंच – गुळाची गोड चटणी – 2 ते 3 टेबलस्पून
  • पांढरे तीळ – 1 टेबलस्पून
  • तेल – तळण्यासाठी

कृती

  • सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आलं, लसूण घालून त्याची पेस्ट तयार करुन घ्या.
  • यानंतर आता एका भांड्यात बेसन आणि पाणी घेऊन त्याची थोडी घट्ट पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये हळद, चवीनुसार मीठ, लाल मसाला, गरम मसाला आणि आलं, लसूण, हिरव्या मिरचीची तयार पेस्ट घाला.
  • त्यानंतर या पेस्टमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • यानंतर शिल्लक राहिलेल्या चपात्यांवर चिंच – गुळाची चटणी व्यवस्थित लावून घ्या. त्यावर बेसनाची तयार केलेली पेस्ट पसरवा.
  • यानंतर वरुन पांढरे तीळ टाका. मग या चपातीला गोलाकार आकारात रोल करा. रोल केलेल्या चपातीचे छोटे, छोटे तुकडे करा. बाकरवडी प्रमाणेच गोलाकार तुकडे करुन घ्या.
  • एका कढईत तेल तापवून घ्यावे. या गरम तेलात बाकरवडी सोडा आणि खरपूस तळून घ्या.
  • उरलेल्या चपातीपासून तयार केलेली ही बाकरवडी एका हवाबंद डब्ब्यात ठेवा. ही बाकरवडी 3 ते 4 दिवस आरामात टिकते.
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)