Maharashtra Breaking News LIVE 18 March 2025 : नागपूर हिंसाचारप्रकरणी 50 जण ताब्यात
  • 18 Mar 2025 08:51 AM (IST)

    साधू महंतदेखील आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून आक्रमक

    नाशिक- साधू महंतदेखील आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून आक्रमक झाले आहेत. गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी पूजे वेळी बिसलेरी पाण्याने आचमन का केले असा सवाल महंतांनी केला. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी गोदावरीची पूजा केली होती.

  • 18 Mar 2025 08:48 AM (IST)

    ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

    ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ठाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

    जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने सोमवार रात्री 12 पासून ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहील.

  • 18 Mar 2025 08:31 AM (IST)

    डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणी मोठी बातमी

    इमारतींसाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या भूमाफियांचा शोध सुरू आहे. महसूल आणि आर्थिक गुन्हे शाखा ( EOW) पोलीस विभाग संयुक्त तपास करत लवकरच याप्रकरणी दोन प्रमुख भूमाफिया आणि एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

  • 18 Mar 2025 08:29 AM (IST)

    शेतकरी नेते रविकांत तुपकर कालपासून भूमिगत

    शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत उद्या होणाऱ्या आंदोलनाला आज बुलढाणा येथून निघणार होते. मात्र त्यापूर्वीच तुपकर यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर तुपकर सध्या भूमिगत आहेत.

  • 18 Mar 2025 08:28 AM (IST)

    नागपुरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात

    महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला काल हिंसक वळण लागलं. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.

  • (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)