अंगावर रंग का टाकला ? जाब विचारल्याने मुजोर तरूणांचा भावा-बहिणीवर कोयत्याने वार

रंगाचा बेरंग झाला… रंग खेळण्यावरून वाद झाल्याने दोघांवर कोयत्याने वारImage Credit source: TV9 bharatvasrh

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होळी उत्साहाने साजरी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी धुळवड, रंग खेळण्यात आले. लहान मोठे सगळेच जण रंगात माखून गेले, आनंदाने सण साजरा केला. मात्र या सणालाही मुजोर तरूणांच्या कृतीमुळे गालबोट लागलेच. दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर काही तरूणांनी रंग टाकला. मात्र तिला ते पटले नाही. न विचारता, ओळख पाळख नसताना अंगावर रंग का टाकला ? असा जाब त्या मुलीने विचारला. मात्र त्या प्रश्नाचा भलताच राग आल्याने त्या तरूणांनी त्या मुलीच्या लहान बहिणीवर कोयत्याने सपासपवार केले. विद्येचे माहेर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये हा भयानक प्रकार घडला असून तरूणांच्या त्या टोळक्याने तिच्या लहान भावाच्या डोक्यात दगडही मारल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुले प्रचंड खळबळ माजली आहे. पीडित मुलगी आणि लहान मुलावर नजीकच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे समजते. याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंगाचा बेरंग झाला, तरूणांच्या मुजोरपणामुळे दोघे जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी येरवड्यात ही धक्कादायक घटना घडली. यासंदर्भात एका महिलेनेयेरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवड्यातील यशवंतनगर भागात राहायला आहेत. महिलेला दोन मुली असून, अकरा वर्षांचा मुलगा अशी तीन अपत्यं आहेत. धुळवडीच्या दिवशी त्यांची 17 वर्षांची मुलगी, घरासमोर असणाऱ्या किराणा माल दुकानात खरेदीसाठी गेली होती. त्या वेळी आरोपी तरूणांनी तिच्यावर अंगावर रंग टाकला. मात्र मुलीला ते बिलकूल आवडले नाही, तिने त्यांन जाब विचारला. त्यांच्यात रंग टाकण्यावरुन वादावादी झाली.

हा वाद ऐकून त्या तरूणीची लहान बहीण आणि भाऊ दोघेही त्यांच्या घरातून बाहेर आले. त्यांनीही त्या तरूणांच्या टोळक्याला जाब विचारला. मात्र वाद वाढून ते तरूण संतापले. रागाच्या भरात टोळक्यातील काही तरूणांनी त्या तरूणीच्या लहान बहिणीवर कोयत्याने सपासप वार केला. एवढंच नव्हे तर त्यांच्या 11 वर्षांच्या लहान भावाला दगडही फेकून मारला. दगड डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्या मुलांच्या आईने येरवडा पोलिसांत धाव घेत याप्रकरणी फिर्याद नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहा जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)