दरम्यान, मान्सून हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दक्षिण छत्तीसगडमधील काही भागामध्ये मान्सून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजेच १० जूनपर्यंत दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच सांगितलं आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी
मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यंदा कमी वेळेमध्ये अधिक पाऊस असा पॅटर्न राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. अगदी तसाच पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये त्याचा फटका बसला आहे. कात्रज, लोहगाव आणि वडगावशेरीला ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला. तर रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर हा दक्षिण भाग सोडला, तर राज्यातील उर्वरित भागात पूर्वमोसमी पाऊस होत आहे.
घराबाहेर पडताना काळजी घ्या
रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील काही ठिकाणी पुढील ३ ते ४ तासात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभाग (मुंबई) च्या वतीने करण्यात आले आहे.