राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील फुटीच्या चर्चेला विराम देतानाच नवीन संकल्प पण सोडण्यात आला. आता राष्ट्रवादीतील कार्यकर्ते मोबाईलवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणतील. याविषयीचा निर्धार सांगली येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. इतकेच नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. आता शरद पवार गटातील कार्यकर्ते सकाळपासूनच एकमेकांना फोनवर बोलताना जय शिवराय करत आहेत.
सांगली येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी आता फोनवर हॅलोऐवजी जय शिवराय असं म्हणायचा आदेश दिला. या पुढे ज्यावेळी आपण एकमेकांशी संवाद साधू त्यावेळी फोनवर लागलीच जय शिवराय म्हणायचं असे त्यांनी स्पष्ट केली. विशेष म्हणजे सांगलीतून लागलीच या नवीन संकल्पाची सुरुवात सुद्धा झाली. हा एक चांगला पायंडा राष्ट्रवादीने पाडला आहे.
जय शिवराय म्हणा
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्यावेळी शिंदे यांनी कोणताही फोन आला तरी आता हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणायचं असा निर्धार सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते सर्व इतिहासामध्ये अजरामर झाले. तुम्ही सुद्धा पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असे आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.
जय शिवराय🙏 pic.twitter.com/J9NMAYv0pB
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 16, 2025
जयंतराव पाटील यांचे ट्वीट
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी समाज माध्यम एक्सवर त्यांच्या या नवीन धोरणाची पोस्ट केली. या पोस्टमध्ये ‘जय शिवराय’ असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्षांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आला आहे. हॅलो ऐवजी, जय शिवराय म्हणा, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह फुंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या औरंजेबाची कबर काढण्यावरून वाद सुरू असताना राजकारणाचा सूर पालटत असल्याचे दिसते.