करुणा शर्मा यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज सुनावणी झाली. या सुनावणीपूर्वीच करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. तसेच मुंडे यांच्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाईल, असं भाकीतच करुणा शर्मा यांनी केलं आहे. मी मागे त्यांचं मंत्रिपद जाणार असं म्हटलं होतं, ते खरं झालंय, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
करुणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत 200 बुथ कॅप्चर केले होते. हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत शपथपत्रात त्यांनी माझं नाव टाकलं नव्हतं. आमच्या केसचा संदर्भही दिला नव्हता. 2014 पासून त्यांनी माझं आणि माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं नाही. धक्कादायक म्हणजे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यावर काही आक्षेप घेतला नाही, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
वॉरंट निघेल
याच प्रकरणावर माझी लढाई सुरू आहे. आता त्याचे वॉरंट निघेल. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. धनंजय मुंडेंना जावं लागेल. धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार हे मी जसं बोलले होते, तसंच सांगते की येत्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावाही करुणा यांनी केला.
पीआयएल दाखल करेन
यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावरही भाष्य केलं. लोकांच्या पैश्यांचा गैरवापर केला जात आहे. लोकांचे पैसे जात आहेत. अशा भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसवलं तर लोकांना काय न्याय मिळणार? त्यामुळे हे लोक सत्तेतून गेले पाहिजे. माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी पीआयएल फाईल करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
खोक्याला दोनदा भेटले
यावेळी त्यांनी सतशी भोसले उर्फ खोक्यावरही भाष्य केलं. मी त्यांना 100 टक्के भेटले आहे. एका बँकेच्या उद्धाटनावेळी भेटले होते. आमची दोन वेळा भेट झाली होती. मला नाथगडावर दर्शनाला जायचे होते. तेव्हा मला गुंडांनी थांबविलं होतं. तेव्हा हा खोक्या भाऊ आला आणि मला घेऊन गेला. माझा सत्कार करण्यासाठी एकदा मुंबईच्या घरी आला होता. माझ्या नवऱ्याचे लोक मला आडवतात आणि खोक्या भाऊ मला दर्शनाला घेऊन गेला याचा मला अभिमान वाटला होता, असंही त्या म्हणाल्या.
कराडचे घर का नाही तोडले?
खोक्याचे घर तोडण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कुणाचं घर कधी तोडू नये आणि जाळूही नये. कोणाचेही घर तोडण्याचा, जाळण्याचा अधिकार नाही. तुम्हाला घरं तोडायची आणि जाळायचीच असेल तर मंत्री, आमदारांची तोडा. हे लोक तरुणांना गुंड प्रवृत्तीकडे नेत आहेत, असं सांगतानाच वाल्मिक कराडचे घर का नाही तोडले? असा सवाल त्यांनी केला आहे. बीड ची परिस्थिती बिकट होती. पण आता एसपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे. खोक्याचा घर तोडले. आता वाल्मीक कराड आणि आमदार, मंत्र्यांचे घरही तोडायला पाहिजे, अशी मागणीही त्यानी केली.