भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. ‘तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत.
नेमकं काय म्हणाले कृपाशंकर सिंग?
त्यांना काही गोष्टी समजायला वेळ लागतो. आज आपण काय बोलत आहोत, उद्या काय बोलणार आहोत? हे त्यांना कधीच कळत नाही. मला वाटतं राज ठाकरे सकाळी-सकाळी उठून भांग वगैरे असं काही तरी घेतात, आणि भांग पिऊन मस्त राहातात. आपण काय बोलतो हे त्यांना कळत नाही, होळीच्या निमित्तानं मला वाटतं त्यांना पण एक भांगेचा गोळा पाठवण्याचा प्रयत्न करतो’, असं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कृपाशंकर सिंग यांच्या या टीकेवर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांना इशारा दिला आहे. आज सगळीकडे सगळेजण मजा करत आहेत, रंगाची उधळण होत आहे. तर त्यांना मजा करू द्याना आणि स्वत:ही मजा करा. कशाला गलिच्छ राजकारण करता. तुमची लायकी नाही राज ठाकरे साहेंबावर टीका करायची आणि जो कोणी राज ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करेल त्याच्या कानाखाली आवाज निघेल. महाराष्ट्र सैनिक गप्प नाही बसणार, कृपा शंकर सिंग यांना इशारा देण्याइतपत ते काही मोठे नाही, राज ठाकरे साहेब म्हणतात तसं ते एक फेरीवाले आहेत. आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात, असा घणाघात खोपकर यांनी यावेळी केला आहे.