दुधी भोपळा की काकडी? उन्हाळ्यासाठी कशाचा रायता उत्तम? रेसिपी आणि फायदे जाणून घ्या

उन्हाळा येताच आपण आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करत असतो. कारण या दिवसात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्याची गरज अधिक असते. या ऋतूत शरीर थंड राहावे आणि ऊर्जा टिकून राहावी म्हणून हलके आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करत असतो. यामध्ये तुम्ही जर पौष्टि‍क आहारासोबत रायत्याचे सेवन केल्यास हा उत्तम पर्याय मानला जातो. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रायता केवळ चविष्टच नाही तर याच्या सेवनाने पचनसंस्था देखील निरोगी राहते. तसेच रायता बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात दुधी भोपळा आणि काकडीचा रायता हे शरीरासाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. दोन्ही भाज्यांमध्ये थंडावा असल्याने शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात.

पण प्रश्न असा पडतो की उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचा रायता जास्त फायदेशीर आहे की काकडीचा रायता? तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही रायतांपैकी कोणता पर्याय सर्वोत्तम असू शकतो? तुम्हालाही उन्हाळ्यात कोणता रायता बनवायचा असा प्रश्न पडत असेल, तर मग दोन्हीचे फायदे तसेच त्यांची रेसिपी जाणून घेऊयात…

दुधी भोपळ्याचा रायता पचन आणि डिटॉक्ससाठी सर्वोत्तम

दुधी भोपळ्यामध्ये 90 % पाणी असते, जे शरीराला हायड्रेशन प्रदान करते. हे पचन सुधारते आणि अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या दूर करते. त्याच वेळी, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यात कमी कॅलरीज असतात. याशिवाय, मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा फायदेशीर मानला जातो. यासोबतच, ते शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते आणि शरीर थंड ठेवते.

दुधी भोपळ्याचा रायता बनवण्याची पद्धत:

सर्वात प्रथम दुधी सोलून किसून घ्या आणि हलके शिजवा. त्यानंतर शिजवलेली दुधी थंड झाल्यावर त्यात घट्ट दह्याचे मिश्रण मिक्स करा. त्यात भाजलेले जिरे, काळे मीठ, पांढरे मीठ आणि कोथिंबीरची पाने मिक्स करा. थोडावेळ तसेच ठेऊन थंडगार सर्व्ह करा.

काकडीचा रायता त्वचेसाठी आणि हायड्रेशनसाठी सर्वोत्तम

काकडीमध्ये 95 % पाणी असते, जे शरीराला पुरेसे हायड्रेशन प्रदान करते. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी ही त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे. ते त्वचेला ताजेतवाने ठेऊन चेहऱ्याची चमक कायम टिकवुन ठेवते. काकडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते, ज्यामुळे पोट थंड राहते. यामध्ये असलेले फायबर अन्नाचे पचन सोपे करून बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. याशिवाय काकडीचा रायता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते.

काकडीचा रायता बनवण्याची पद्धत:

ताजी काकडी किसून घ्या. या किसलेल्या काकडीमध्ये दही मिक्स करा. त्यानंतर यामध्ये भाजलेले जिरे, काळे मीठ, पुदिना आणि बारी‍क चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. त्यानंतर थंडगार सर्व्ह करा.

दुधी भोपळा आणि काकडीचा रायता यात कोणता चांगला आहे?

जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा डिटॉक्सिफिकेशनची गरज असेल तर दुधी भोपळ्याचा रायता सर्वोत्तम असेल. त्याच वेळी, जर तुम्हाला अधिक हायड्रेशनसाठी आणि तुमच्या त्वचेला चमकदार ठेवण्यासाठी काकडीचा रायता सर्वोत्तम असेल. दोन्ही रायते थंडगार आहेत, पण वजन कमी करण्यासाठी दुधी रायता जास्त फायदेशीर आहे. चवीच्या बाबतीत, काकडीचा रायता अधिक ताजा असतो आणि तो न शिजवताही लवकर तयार करता येतो. तर तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणताही रायता तुमच्या आहारात समाविष्ट करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)