Jay Pawar Rutuja Patil : पवार कुटुंबातील मोठी बातमी ! जय पवार अडकणार लग्नाच्या बेडीत, नात सुनेने घेतले शरद पवारांचे आशीर्वाद

पवार कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. येत्या 10 एप्रिल रोजी जय यांचा साखरपुडा होणार आहे. जय यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव ऋतूजा पाटील आहे. ऋतूजा आणि जय यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. जय आणि ऋतूजा यांच्या विवाहाच्या निमित्ताने पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. त्यामुळे या लग्न सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जय आणि ऋतुजा यांनी बारामतीतील मोदी बागेत जाऊन आजोबा शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दोघांनीही आजी-आजोबांसोबत फोटो काढले. तर सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबातील इतर महिलांनी जय पवार आणि ऋतुजा यांची ओवाळणी केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ऋतुजा आणि जय पवार यांच्या विवाहाची माहिती दिली.

आम्हाला खूप आनंद झाला

खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीची माहिती दिली आहे. जयचं लग्न ठरल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आमची येणारी सून ऋतुजा काल घरी आली होती. तिने शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. काल आम्ही सर्वजण ऋतुजाला भेटलो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कधी आहे साखरपुडा?

जय आणि ऋतुजाचा साखरपुडा येत्या 10 एप्रिल रोजी आहे. पुण्यातच हा साखरपुडा पार पडणार आहे. या साखरपुड्याला राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर येणार असल्याचं सांगण्यात येतं. बऱ्याच दिवसानंतर पवार कुटुंबात लग्न सोहळा होत आहे. तसेच मधल्या काळात शरद पवार आणि अजित पवार राजकीयदृष्ट्या वेगळे झाले होते. त्यामुळे कुटुंबात काही काळ तणावाची परिस्थिती होती. त्यानंतर आता या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येताना दिसणार आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहे ऋतुजा?

ऋतुजा पाटील ही उच्च शिक्षित आहेत. ती सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांची कन्या आहे. जय आणि ऋतुजा हे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. तर ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टुर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)