राजकारणात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराजित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. त्यातील एक डावपेच म्हणजे मतदारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल संभ्रम निर्माण करणे आणि त्यासाठी सारख्या नावाच्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास भाग पाडणे हा होय. लोकसभा निवडणुकीत ही क्लृप्ती मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली.
राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवली. १७ लोकसभा मतदारसंघांत २० डमी उमेदवारांनी नशीब आजमावले. या लढाईत यापैकी कुणालाही यश आले नसले तरी वीस जणांनी सुमारे दोन लाख मते मिळवली. यातील काही उमेदवारांनी पक्षाच्या नावावर तर काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
रायगड, मुंबईत दोन दोन उमेदवार
रायगड आणि मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन डमी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. रायगडमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनंत गिते यांच्या नावाशी साध्यर्म असलेले अनंत बालोजी गिते आणि अनंत पद्य गिते असे दोन उमेदवार निवडणूक लढवत होते. या दोघांना अनुक्रमे ३,५१५ आणि २,०४० इतकी मते मिळाली. उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्याप्रमाणे नाव असलेल्या तिघांनी अर्ज भरले होते. मात्र एकाचा अर्ज बाद झाल्याने संजय बी पाटील (२,७६४ मते) आणि संजय पाटील (५२४ मते) या दोघांनी निवडणूक लढवली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या मतदारसंघांत सारख्या नावांचे उमेदवार
अमरावती, बारामती, भिवंडी, दिंडोरी, हिंगोली, जळगाव, लातूर, मावळ, मुंबई उत्तर पूर्व, दक्षिण मुंबई, उस्मानाबाद, परभणी, रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, रावेर, शिर्डी, वर्धा या मतदारसंघात सारखी नावे होती. काहींचे नाव तर काहींचे आडनाव सारखे होते तर काही मतदार संघात डमी उमेदवाराचे नाव आणि आडनाव दोन्ही प्रमुख उमेदवाराप्रमाणेच होते.