२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईत ३६०० घरं उभारण्याचं म्हाडाचं नियोजन आहे. पवई, मागाठाणे, कन्नमवार नगर, पहाडी गोरेगाव, अॅन्टॉप हिल अशा ठिकाणी ही घरं असणार आहेत. मागील वर्षी म्हाडाने ऑगस्ट महिन्यात ४०८२ घरांसाठी मुंबईत लॉटरी काढली होती. ४०८२ घरं उपलब्ध असताना या घरांसाठी तब्बल १ लाख २२ हजार अर्ज आले होते. आता ३६०० घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती आहे.
मागील वर्षी ४०८२ घरांची सोडत
मुंबई बोर्डाच्या २०२३ मध्ये जाहीर झालेल्या ४०८२ घरांच्या लॉटरीपैकी अद्याप १५० घरांची विक्री झालेली नाही. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना मागील सोडतीतील उर्वरित घरांचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना पैसे भरुन घर घेण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे. या संधीनंतरही घरं विकली गेली नाहीत, तर पुढील लॉटरीत या घरांचा समावेश केला जाईल.
गेल्या सोडतीत १९६ अर्जदारांना एकापेक्षा जास्त घरं लागली होती. नियमानुसार कोणताही अर्जदार एकापेक्षा जास्त घर घेऊ शकत नाही. त्यानंतर अर्जदारांनी एकाहून अधिक लागलेली घरं म्हाडाला परत केली. त्याशिवाय २०० अर्जदार असे होते, ज्यांना लॉटरी लागली पण कागदपत्रांमधील त्रुटी किंवा चुकीची माहिती असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांना घरं परत करावी लागली. यानंतर वेटिंग लिस्टमधील लोकांना ही घरं वाटप करण्यात आली आहेत. सध्या केवळ दीडशे घरांची विक्री बाकी आहे.
वर्षभरात १३ हजार नव्या घरांच्या निर्मितीचं उदिष्ट्यं
२०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबई आणि मुंबई उपनगरसह पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरांतदेखील म्हाडा घरं उभारणार आहे. या अंतर्गत जवळपास १२ ते १३ हजार घरांची निर्मिती होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.