पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, आज सकाळीच महिला दिनी एक धक्कादायक घटना समोर आली. बिएमडब्लूमधून आलेल्या एका मद्यधुंद तरुणानं रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या महिलांसमोरच अश्लिल कृत्य केलं. शहरातील येरवडा परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा ते कात्रज बसमध्ये प्रवासादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेच्या शेजारच्या सीटवर बसून एक 45 वर्षीय व्यक्ती अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पाच मार्चला घडल्याचं सांगण्यात येत आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तब्बल 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कमलेश प्रल्हाद शिरसाठ असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. घटनेच्या अवघ्या 48 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे.
भरस्त्यात तरुणाचं अश्लिल कृत्य
पुण्यामध्ये आज सकाळी एक संतापजनक घटना घडली आहे. बिएमडब्लूमधून आलेल्या एका तरुणानं रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या महिलांसमोरच अश्लिल कृत्य केलं आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा हा तरुण मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. त्याच्यासोबत आणखी एक तरुण असल्याचं देखील दिसत आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याचे वडील मनोज आहुजा यांना ताब्यात घेतलं आहे. गौवर अहुजा याच्या वडिलांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आता पोलीस तपास सुरू आहे.