बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ कात्रज-आंबेगाव येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
‘आमच्या उमेदवाराने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात काटेवाडी गाव पहिले आणले. विद्या प्रतिष्ठानचे कामही पाहिले. टेक्सटाइल पार्कमध्ये पाच हजार महिला काम करतात. सध्याच्या खासदाराला पंधरा वर्षे निवडून दिले; पण तुम्हाला काहीच मिळाले नाही. मी बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. मला विकास करायचा अनुभव आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याची आवड आहे. आमचा फायदा उठवायचा असेल, तर साथ द्या,’ असे आवाहन पवार यांनी केले.
‘मत मागताना लाज वाटायला हवी’
‘दादा तुम्ही केलेली कामे सध्याच्या खासदारांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये छापली आहेत, असे काहींनी मला सांगितले आहे. २०१९च्या निवडणुकीवेळी भोर, वेल्हे भागात ‘एमआयडीसी’चा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले होते; पण प्रत्यक्षात त्यांनी केवळ भाषणे केली. माझ्यासारख्याला तर लाज वाटली असती, की कोणत्या तोंडाने मत मागायला जाऊ. मी सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करू शकतो; पण भाषणे करून लोकांचे पोट भरणार आहे का,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
याआधी घड्याळ्याचे बटण दाबल्यानंतर निवडून येणारा खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी संसदेत जायचा. आता समर्थन करायला जाणार आहे. अजित पवार भाषण करणार आणि पळून जाणार असे सगळ्यांना वाटू लागले आहे. मी इथेच आहे. आचारसंहिता संपली की भेटा. लोक झोपेतून उठण्याच्या आधी मी सकाळी सात वाजता कामासाठी तयार असेन – अजित पवार, उपमुख्यमंत्री