शहरातील रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्याला पोलिसांचे प्राधान्य आहे. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही सातत्याने काही घटना घडत आहेत. त्यामुळे ‘व्हिजिबल पोलिसिंग’ वाढविण्यावर आणखी भर देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नियमितपणे कोपरा सभा घेण्यास सांगितले आहे. या सभांमध्ये लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्याकडून काही सूचना घेणे, आदी सूचना केल्या आहेत.
‘उपद्रवीं’ना रेकॉर्डवर आणणार
रस्त्यांवरील गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या संख्येने असल्याचे दिसून येते. ही मुले कोण आहेत, काय करतात, त्यांना कोणाचे पाठबळ असते का, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यात येत आहे. या मुलांच्या नोंदी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
‘वायरलेस’चा वापर बंधनकारक
शहरात नुकत्याच घडलेल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अपघात, त्या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा आदी माहिती उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली नव्हती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संवादातील अभावामुळे माहितीचे अदान-प्रदान थांबू नये, या विचाराने सर्वांनी वायरलेस फोनचा वापर करावा, अशी सूचना दिली आहे, असे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
लोकांना पोलिस ठाण्यात बोलावून संवाद साधताना ठराविक लोकच येतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांना पोलिस ठाण्यात न बोलावता लोकांमध्ये जाण्याची सूचना स्थानिक पोलिसांना केली आहे.
– शैलेश बलकवडे, अतिरिक्त आयुक्त, गुन्हे शाखा