संतोष देशमुख यांचे हाल-हाल करून त्यांना मारण्यात आलं. त्याच्या हत्येचे काही व्हिडीओ आणि 8 फोटो समोर आले. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम या फोटोतून उलगडला. त्यानंतर राज्यातील वातावरण प्रचंड तापलं, हे फोटो समोर आल्यानंतर 3 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल दबाव वाढला. रात्री देवगिरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर अखेर काल धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्वीकारत पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवल. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते आक्रमक भूमिकेत असून त्यांच्या राजीनाम्याला एवढा उशीर झाल्याबद्दल अनेकांनी सरकारवर ताशेरे ओढले.
टीव्ही9 ची तिसरी मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिट आज पार पडली. यावेळी मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि टीव्ही भारत वर्ष सीनिअर अँकर गौरव अगरवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेतली. अनेक मुद्यांवर चर्चा करताना मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलही सवाल विचारला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर, जनक्षोभ उसळल्यानंतर काल धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. पण याला इतका वेळ का लागला ? असा सवाल लोकांच्या मनात आहे. सोमवारी रात्री देवगिरीवर झालेल्या मीटिंगमध्ये राजीनाम्यासाठी तुम्हाला धनंजय देशमुख यांना धमकी द्यावी लागली का? जनक्षोभामुळे हा राजीनामा घ्यावा लागला का ? असा थेट सवाल उमेश कुमावत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.
तेव्हाच मी ते फोटो पाहिले..
लोकांना सिस्टीम समजत नाही. ज्यावेळी ही घटना घडली. त्यानंतर मी सीआयडीची चौकशी लावली. मी सीआयडीच्या लोकांना सांगितलं की त्यात हस्तक्षेप नसेल. तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा. आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले, हरवलेले मोबाईल शोधले. तसेच त्यांनी संपूर्ण डेटा दिला. त्यामुळे फोटोही समोर आले. ते फोटो कोणी शोधले नाही, तर चार्जशीटमधील आहे. सीआयडीच्या कामात कुणाचा हस्तक्षेप केला नाही. ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली त्यावेळी मला कळलं काय तपास आहे. पण तोपर्यंत मी एकदाही सीआयडीकडे माहिती मागितली नाही. मी तोपर्यंत फोटोही पाहिले नव्हते. चार्जशीट दाखल झाल्यावरच मी फोटो पाहिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मीच सॅनिटाईज केले नाही. त्यामुळे इतरांची हिंमत झाली नाही,अस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
म्हणून निर्णय घ्यायला उशीर झाला
निकम यांची नियुक्तीला उशीर का केला. कारण प्रॉसिक्युशनच्या नियमानुसार प्रॉसिक्युशन लॉयर चार्जशीटमध्ये असिस्ट करू शकत नाही. त्यामुळे ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली, त्याच दिवशी आम्ही अपॉइंट करू शकतो. नाही तर टेक्निकली जे गुन्हेगार असतात त्यांना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. प्रॉसिक्युशन लॉयरने चार्जशीटमध्ये हस्तक्षेप केला असेल तर टेक्निकली ही केस होत नाही, असा कोर्टाचा निर्णय आहे. ते लोकांना कळत नाही. लोक आमच्यावर रोज आरोप करतात. यांची नियुक्ती का केली नाही, त्यांची उशिरा नियुक्ती का केली ? असे सवाल विचारले जातात.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला,की चुकीच्या वेळी झाला याच्या चर्चेत मी जात नाही. राजकारणात पहिल्या दिवशी राजीनामा होवा की शेवटच्या दिवशी, लोकांना जे बोलायचं ते तेच बोलतात. फोटो समोर आले, ज्या प्रकारे ती हत्या झाली आहे आणि हत्येचा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं गेलं तो मंत्र्यांच्या इतक्या जवळचा आहे तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर होता. पण फर्मली आम्ही डील केलं आणि त्यांनी राजीनामा दिला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मला जे सांगायचं होतं.
तुम्ही धनंजय मुंडेंना राजीनाम्यासाठी धमकी दिली का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांना पुन्हा विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फक्त दोन वाक्यांत उत्तर दिलं. ” मला जे सांगायचं होतं,. ते मी सांगितलं. त्या उपर सांगणं योग्य नाही ” असं म्हणत त्यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.