Devendra Fadnavis : पंडित नेहरुंचा निषेध करण्याची हिम्मत आहे का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट सवाल

समजावादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली. त्यासाठी अधिवेशन संपेपर्यंत आझमींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण अबू आझमी यांच्या वक्तव्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. महाराष्ट्र विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधान परिषदेत अबू आजमींच्या वक्तव्यावरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये गदारोळ पहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिलेक्टीव्ह निषेधाच्या मुद्यावरुन विरोधकांना कोंडीत पकडलं. आक्रमकपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले.

“अबू आजमीला 100 टक्के जेलमध्ये टाकू. तुम्ही थोडी नीट माहिती घेतली पाहिजे. कोरटकरने कोल्हापूरच्या कोर्टातून स्वत:च्या अटकेला स्थगिती घेतली आहे. मी त्याच्या वर जायला सांगितलं आहे. हे कोरटकर वैगेरे चिल्लर लोक आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मला सांगा जितेंद्र आव्हाड बोललेत, त्यावर कधी निषेध केला नाही. जितेंद्र आव्हाड म्हणतात की, औरंगजेब होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब किती बलाढ्य होता. महाराज पाच फुटाचे होते, त्याचा निषेध नाही केला तुम्ही. असा सिलेक्टीव्ह निषेध करु नका” असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं.

‘निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का?’

“त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की, पंडित जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का?. आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. ‘देश, धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी एकही शंभूराजा था’ त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरु यांचा धिक्कार झाला पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात बोलत असताना गदारोळ सुरु होता. त्यामुळे विधान परिषेदच्या सभापतींनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं.

औरंगजेबची कबर लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेका – नवनीत राणा

“अबू आजमी यांनी जे वक्तव्य केलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व आमच्या सरकारने अबू आजमी यांना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केलं आहे” असं नवनीत राणा म्हणाल्या. “सरकारला अजून एक विनंती आहे की ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाहीत, त्याच पद्धतीने संभाजीनगरमध्ये जी औरंगजेबची कबर आहे, ती सुद्धा लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे” असं नवनीत राणा म्हणाल्या. “अशी जी लोकं वक्तव्य करणारे आहेत व ज्यांना या औरंगजेब बापावर प्रेम आहे, अशा लोकांना ही शीक भेटली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे नाही, तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात” असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)