रेल्वे मंडळाच्या सिग्नल अँड टेलिकॉम विभागाने सन २०२१मध्ये परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रुळांवरील क्रॉसओव्हरवरून (एका रुळावरून अन्य रुळावर जाण्यासाठी असलेला भाग) रेल्वेगाडी २५० मीटर पुढे गेल्यानंतर तो रूळ अन्य गाडीसाठी खुला केला जातो. नव्या इंटरलॉकिंग यंत्रणेत याचे पालन करणे गरजेचे आहे. यापूर्वी क्रॉसओव्हरवरून ७० मीटर रेल्वेगाडी गेल्यानंतर अन्य रेल्वेगाडीसाठी मुभा देण्यात येत होती.
१५ किमी प्रतितास वेगमर्यादेसह अंतर पार करण्यासाठी प्रत्येक मेल-एक्स्प्रेसला साधारण एक ते सव्वा मिनिटाचा अतिरिक्त वेळ लागतो. सीएसएमटीवरून सुमारे २५० रेल्वे गाड्या धावत असल्याने सर्वच गाड्या विलंबाने धावत आहेत. फलाट क्रमांक ८ ते १८वर क्रॉसओव्हर आहेत, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीएसएमटीमध्ये अतिरिक्त मार्गिका नसल्याने अप-डाउन मेल-एक्स्प्रेस आणि जलद लोकल एकाच मार्गिकेवरून धावतात. परिणामी सीएसएमटी ते मशीददरम्यान मेल-एक्स्प्रेसची लांबलचक रांग लागते. याचा परिणाम उपनगरीय गाड्यांवर होतो. सीएसएमटीतील उपनगरी फलाटांवर गाड्या विलंबाने पोहोचत असल्याने त्या विलंबाने धावतात. परिणामी सर्व लोकलफेऱ्यांना मोठा विलंब होतो.
मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाच्या सिग्नल अँड टेलिकॉम विभागाला पत्र लिहून परिपत्रकातील नियम शिथिल करण्याची विनंती केली आहे. नियम शिथिल झाल्यास रेल्वेगाड्या नियमित वेळेत सीएसएमटीमध्ये पोहोचून त्यांची हाताळणी अतिरिक्त वेळेशिवाय करता येईल. याबाबत रेल्वे मंडळाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कल्याण-कसारा-कर्जतहून धावणाऱ्या गाड्या दादर-भायखळ्यापर्यंत निर्धारित वेगाने येतात. मात्र भायखळ्याच्या पुढे मेल-एक्स्प्रेस, जलद गाड्या एकामागोमाग एक उभ्या असतात. हे टाळण्यासाठी रविवारपासून रोज सुमारे २२ ते २४ किमी अंतरातील लोकल रद्द करण्यात येत आहेत.
उद्घोषणाही होत नसल्याने मनस्तापात भर
कसारा-कर्जत मार्गावरील लोकल गाड्यांना आधी कल्याण स्थानकात प्रवेश करताना अनेकदा थांबवण्यात येते. यामुळे १० ते १५ मिनिटांचा विलंब त्या ठिकाणी होतो. कल्याण ते दादर-भायखळा लोकल वेगाने धावते, मात्र गेल्या रविवारपासून सीएसएमटीच्या आधी लोकल थांबतात. सातत्याने सुरू असलेल्या लोकलविलंबाबाबत उद्घोषणाही होत नसल्याने प्रवाशांच्या मनस्तापात अधिकच भर पडते आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संजय देशमुख यांनी दिली.