सर्वसाधारणपणे मुंबईत ११ जून ही मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख मानली जाते. पण यंदा मान्सूनपूर्व सरींचा दिलासा मिळाला नसला तरी मुंबईत मान्सून सरासरी तारखेच्या आधीच दाखल होईल, असा अंदाज आहे. सन २०२३मध्ये मान्सूनचे वारे रखडल्याने २५ जूनला मुंबईत मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. गेल्या वर्षी मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांमध्ये एकत्रच मान्सून दाखल झाला होता.
कोकण विभागात आज बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, सिंधुदुर्गात रविवारी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी पडू शकेल. कोल्हापूर जिल्ह्यातही रविवारी घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना रविवारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघरसाठी अॅलर्ट
महामुंबई परिसरामध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत मुंबईमध्ये पावसाची उपस्थिती नव्हती. गुरुवारच्या अद्ययावत इशाऱ्यानुसार शुक्रवारीही मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना, वीजांसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.