नवाब मलिक सत्ताधारी बाकड्यांवर बसले, भाजपचा तीव्र आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचे स्वतः अजित पवारांसह अनेकजणांनी स्पष्ट केले होते. मलिक हे आजारी असल्यामुळे जामिन मिळाल्यानंतरही राजकारणात सक्रीय झाले नव्हते. मात्र नागपूर अधिवेशनाला ते गेले असताना भाजप व शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत बसले असता तीव्र आक्षेप नोंदवला होता.
नबावभाईंच्या मतदारसंघात शेवाळे पिछाडीवर
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही मलिक सक्रीय नव्हते. त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे हे मलिक यांच्या अणुशक्ती नगर या विधान सभा मतदारसंघात जवळपास ३० हजार मतांनी पिछाडीवर गेल्याचे समोर आले आहे.
मलिकांना सक्रीय ठेवायचे की नको, दादांवर भाजप-शिंदेसेनेचा दबाव
मलिक यांच्यासोबत आमची सहानुभूती असल्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी वारंवार म्हटले आहे. ते जामिनावर सुटल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अजित पवार गटासोबतच शरद पवार गटाचेही सर्व नेते गेले होते. मात्र प्रत्यक्षात भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेच्या दबावामुळे मलिक यांनी सार्वजनिक जीवनात सक्रीय व्हावे किंवा कसे याबाबत अजित पवार पक्षाचे नेतृत्व अद्यापही संभ्रमात असून पक्षाचा लोकसभेत झालेल्या मोठ्या पराभवानंतरही मलिक यांना बोलावून भाजपची नाराजी ओढवून न घेण्याचाच राष्ट्रवादी काँग्रेसचा कल दिसत असल्याचे आज स्पष्ट झाले.