लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्यासाठी पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी गुरूवारी मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभवामागील कारणमिमांसा करण्यासाठी तसेच त्यावर चर्चा करून येत्या काळात चुका दुरूस्त करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. परंतु या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाच्या ५ आमदारांनी विविध कारणे सांगून दांडी मारली. त्यामुळे लोकसभा निकालानंतर दादा गटातील आमदारांच्या मनात नेमके काय सुरू आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे रोहित पवार यांनी ‘तिकडच्या’ बऱ्याच लोकांनी आमच्याशी संपर्क केला आहे, असा दावा केल्यानंतर या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.
कोणत्या पाच आमदारांची दांडी?
अजित पवार गटाच्या मंत्र्यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, आण्णा बनसोडे आणि राजेंद्र शिंगणे या आमदारांची अनुपस्थिती होती.
यापैकी बहुतांश आमदारांनी बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे आधीच पक्षाला कळविले होते, अशीही माहिती समोर येत आहे. धर्मराव बाबा आत्राम आणि राजेंद्र शिंगणे आजारपणाच्या कारणामुळे, झिरवळ परदेशवारीमुळे तर सुनील टिंगरे आणि आण्णा बनसोडे वैयक्तिक कारणास्तव बैठकीला गैरहजर राहिले, अशी माहिती आहे.
‘देवगिरी’ निवासस्थानी बड्या नेत्यांची बैठक
तत्पूर्वी, अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मंत्री उपस्थित होते.