दोघांच्या सहमतीने हे सगळे झाले…स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा, कोर्टात नेमके काय घडले?

Pune Bus Rape Case: पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर 25 फेब्रुवारी रोजी एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 72 तासानंतर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शुक्रवारी संध्याकाळी कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. परंतु आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केला. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेलीय. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत, असे आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.

काय म्हणाले आरोपीचे वकील

कोर्टात युक्तीवाद करताना आरोपीचे वकील वजीदखान बीडकर, साजिद खान यांनी म्हटले की, मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. मुलीच्या मर्जीने हे संबध झाले आहेत. दोघांच्या सहमतीने हे सगळं झाले आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवस कोठडी द्यावी. आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये आले आहेत. मग बुरखा घालून आरोपीला कोर्टात का आणले गेले? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी विचारला.

आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. पण गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही. हे प्रकरण माध्यमांमुळे वाढले आहे. त्यामुळे आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी वकील वजीदखान यांनी केली.

सरकारी वकिलांनी खोडला दावा

सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. सरकारी पक्षातर्फे कोर्टात सांगण्यात आले की, आरोपीने ताई म्हणत फिर्यादीला फसवले. तुमच्या गावाला जाणारी बस कोठे लागते ते दाखवतो, असे सांगून बसमध्ये घेऊन गेला. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याचावर 6 गुन्हे दाखल आहे. त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन समजतो.

यासाठी हवी 14 दिवसांची कोठडी

आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता? याचा तपास करायचा आहे. गुन्हा केला तेव्हा आरोपीकडे मोबाईल होता. त्याचा तपास करायचा आहे, यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)