राष्ट्रवादीच्या फुटीविषयी बोलताना पटेल यांनी भूतकाळातील काही घटनांचा आधार घेतला. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला बाहेरून पाठिंबा दिलाच होता. २०१९मध्ये झालेला पहाटेचा शपथविधीही पवार यांच्याच आशीर्वादाने झाला होता. त्यामुळे भाजप आपल्याला अस्पृश्य नाही, हा विचार राष्ट्रवादीच्या आमदारांत रुजला होता. त्यातही कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेपेक्षा भाजप वाईट नाही, असाही विचार सगळ्यांच्या मनात आला’, असे पटेल म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात सर्वाधिक टीका शरद पवार यांच्यावरच केली, हेही आपण विसरून चालणार नाही, याची आठवण पटेल यांनी करून दिली.
‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून जशी शिवसेनेच्या आमदारांत अस्वस्थता होती, तशी राष्ट्रवादीच्या आमदारांतही वाढीस लागली होती. परंतु, करोनाकाळ आला आणि राजकारण पूर्णपणे थंडावले. पण त्यादरम्यान या अनैसर्गिक आघाडीमुळे आम्हाला किती धोका आहे, हे सर्वांना कळून चुकले. कुठल्याच आमदारांची काहीही कामे होत नव्हती. जर लोकोपयोगी कामे झाली नाहीत, तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे कसे, याविषयी आमच्याही मनात चिंता होती. त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ते आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. त्याचदिवशी आमचीही एक बैठक झाली’, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला.
‘या बैठकीत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात असलेले जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनीही आपण भाजपसोबत जाऊ, अशी भूमिका मांडून सही केलेले पत्र तत्कालीन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हाती दिले. ५३ पैकी ५१ आमदारांच्या त्यावर सह्या होत्या. पण, पुढे काय झाले ठाऊक नाही. शरद पवार यावर काहीच बोलले नाही. अनेकदा भाजपच्या जवळ जाऊन परत येणारे पवार असे का करतात, याचा उलगडा कुणालाच झाला नाही. पण, प्रवाहासोबत राहायला हवे, अशी भूमिका सर्वच आमदारांची होती’, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळेच अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे पटेल म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत बोलताना, नाशिकच्या जागेवर आम्ही अजूनही दावा सोडला नसल्याचा पुनरुच्चार पटेल यांनी केला. तर, भंडारा-गोंदिया, परभणी या दोन जागा आम्ही सामाजिक समीकरणे पाहता मित्रपक्षांना सोडल्या. आता जरी आम्ही कमी जागा लढवत असलो तरी त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीत होईल, असा शब्द अमित शहा यांनी दिल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले.
‘राष्ट्रवादीला दोन राज्यसभा जागा’
‘जागावाटपात सातारा ही जागा राष्ट्रवादीने भाजपला सोडली. परंतु, त्याबदल्यात आम्ही राज्यसभेची जागा मागितली होती. अमित शहा यांनी पियुष गोयल यांची रिकामी होणारी जागा आम्हाला देऊ केली आहे, असे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे माझी, शिवाय नुकतीच मी राजीनामा दिल्याने रिक्त झालेली आणि गोयल यांची अशा तीन राज्यसभा जागा पक्षाकडे असतील’, असे पटेल म्हणाले.
‘मुख्यमंत्रिपदाचे वाटप व्हायला हवे होते’
‘काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी ही कल्पनाच उडवून लावली होती. परंतु, शरद पवार यांनी दिल्लीत जाऊन त्यांची समजूत काढली. पुन्हा पवार यांनीच आग्रह करून उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. त्यानंतर मुख्यमंत्रिपद काही काळासाठी राष्ट्रवादीला द्यावे, असा प्रस्ताव घेऊन मी स्वतः उद्धव यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी पद अडीच किंवा दोन वर्षे तरी राष्ट्रवादीला द्यावे, असा प्रस्ताव मी त्यांच्या पुढ्यात ठेवला. मात्र ते काहीच बोलले नाहीत. पवारांनीही त्यावर काहीच भूमिका घेतली नाही’, याविषयी पटेल यांनी आश्चर्य व्यक्त केले.
‘पवारांचे मोदींसोबत उत्तम संबंध’
२००४ मध्ये यूपीएचे सरकार केंद्रात आले, तेव्हा जरी गोध्राकांडामुळे काँग्रेस मोंदीच्या विरोधात होते. तरीही शरद पवार यांचे त्यांच्याशी संबंध अतिशय चांगले होते. काँग्रेस नेतृत्वाने तर आम्हालाही अनेकदा सुचवले की गुजरातमध्ये शासकीय कार्यक्रम असले तर मोदींना निमंत्रण पाठवू नका. पण पवारांनी त्यांचे मोदींशी असलेले संबंध जपले. मुख्यमंत्री असताना दिल्लीत आले की मोदी पवारांची भेट घेत. मोदी मुख्यमंत्री असताना अनेकदा ते महाराष्ट्रातही येत. आमच्या बैठका होत असत’, अशी आठवण पटेल यांनी सांगितली. आजही पवार मोदींना भेटायला गेले की त्यांना प्राधान्य दिले जाते, असेही पटेल म्हणाले.
‘मुंबईकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले’
‘पक्षाच्या स्थापनेपासूनच मुंबई, पुणे या शहरांकडे राष्ट्रवादी पक्षाचे दुर्लक्ष झाल्याचे पटेल यांनी मान्य केले. १० वर्षे आघाडी सरकार असूनही मुंबईत पक्ष रुजला नाही. पक्षनेतृत्व आणि इतर नेत्यांनीही त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. मात्र, आता आम्ही ही त्रुटी दूर करण्याचे ठरवले असून अजित पवार यांचे मुंबईकडे विशेष लक्ष आहे’, असेही पटेल यांनी आवर्जून सांगितले.
‘आमच्या मूल्यांवर आम्ही ठाम’
‘आम्ही भाजपसोबत युती केली म्हणजे आम्ही धर्मनिरपेक्ष मूल्यांना तिलांजली दिली नाही. अनेक अल्पसंख्याक समाजातील नेते आमच्या संपर्कात असून त्यांना पक्षात येऊन देशाच्या विकासात हातभार लावायचा आहे. भाजपवर धर्माधिष्ठित राजकारणाचा आरोप करणाऱ्यांनी हे स्पष्ट करावे की, केंद्राच्या योजना धर्माच्या आधारावर भेदभाव करतात का? मोदींच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांत असा एकही प्रसंग घडलेला नाही’, असेही पटेल यांनी अधोरेखित केले.