स्वारगेट बस स्थानकात घडलेली अत्याचाराची घटना शांततेत घडली, असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यानंतर आता त्यावरून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. घटनेच्यावेळी पीडित तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, असंही कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं होतं. त्यावर आता विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.
योगेश कदम यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, गृहराज्यमंत्री हे दिव्य आहेत. पीडितेने प्रतिकार केला नाही म्हणून बलात्कार झाला असं ते म्हणत आहे. पीडितेने स्ट्रगल करायला हवं होतं असं कदम म्हणत आहेत, म्हणजे तिने काय करायला हवं होतं? असा खोचक प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर मंत्रीपदावर असलेला व्यक्ती अशाप्रकारे बेजबाबदारपणे विधान करत असेल, पीडित महिलांचा अपमान करून त्यांच्यावर शंका उपस्थित केल्या जात असतील तर महाराष्ट्रातल्या महिला अन्याय झाल्यावर न्याय मागायला कशा जाणार? कदम यांनी केलेलं विधान हे अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.