बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरलेले, प्रसंगी काका अजित पवारांवर तिखट हल्ला चढवणारे युगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. युगेंद्र पवार विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. बारामतीत त्यांनी आत्येला विजयी करण्यासाठी केलेली कामगिरी पाहता विधानसभेला त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
बारामतीमधील पक्ष कार्यालयाची सूत्रं हाती घेत युगेंद्र पवारांनी सुळेंसाठी प्रचारयंत्रणा राबवली. बहुतांश आमदार सत्तेत गेलेल्या अजित पवारांसोबत असताना, उपमुख्यमंत्री असलेल्या काकांकडे प्रचंड मोठी यंत्रणा असताना युगेंद्र पवार आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळेंसाठी हिमतीनं उभे राहिले. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात ते अजित पवारांना कडवी टक्कर देऊ शकतात, असं पवार गटाला वाटतं.
राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवार हेच सुळेंच्या प्रचाराचं काम पाहायचं. गेल्या २ निवडणुकांमध्ये विरोधकांनी सुळेंना पाडायला ताकद लावली. तेव्हा बारामतीमधलं मताधिक्क्य सुळेंच्या कामी यायचं. यंदा मात्र अजित पवार विरोधात गेल्यानं बारामतीत ५०-५० मतदान होईल असा अनेकांचा कयास होता. पण सुळेंनी अजित पवार निवडून येत असलेल्या बारामतीमधून ४८ हजार १६८ मतांची आघाडी घेतली. खुद्द अजित पवार त्यांची संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत असताना, त्यांची पत्नी रिंगणात असताना सुळेंना बारामतीत मिळालेलं मताधिक्क्य दादांची चिंता वाढवणारं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीत कुटुंबातला उमेदवार दिल्यास अजित पवारांना निवडणूक जड जाईल.