कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवले असल्याबाबत अधिकृत माझ्यापर्यंत काही आलेले नाही. काही कार्यकर्त्यांकडून माझ्या कानावर आले की, परवा एका ठिकाणी बैठक झाली आहे. मात्र माझ्याकडे कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
निवडणूक झाल्यानंतरच ही चर्चा सुरू झाली आहे. असा प्रश्न केला असता युगेंद्र पवार म्हणाले की, ही केवळ चर्चा आहे. कोणी कशावरही चर्चा करेल. मात्र, प्रत्येक चर्चा खरीच असते असे नाही. गेली तीन ते चार वर्षांपासून कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्याकडे आहे. या काळात आपण खूप कामे केली आहेत. अजितदादांनी पण खूप मदत केली, असंही युगेंद्र पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या बाजूने काम केल्याची ही पोच पावती आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले की, अद्याप याबाबत माझ्याकडे अधिकृत काहीही आले नाही. मात्र, तुम्ही याबाबत जो अर्थ लावायचा असेल तो लावू शकता. यासंदर्भात जर काही पत्र व्यवहार झाला तर ज्येष्ठ नेते शरद पवारांचीही भेट घेईल, असेही पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्या विजयाबाबत बोलताना ते म्हणाले की, जे आम्हाला अपेक्षित होतं ते झालं आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ मिळालं.. आणि सुप्रियाताई निवडून आल्या. याचा आम्हाला आनंद आहे.