महायुतीची पिछेहाट, पण भाजपचा मंत्री सुसाट; १००% स्ट्राईक रेट, ३ जागांवर यश, पक्षाची लाज राखली

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाची मोठी पिछेहाट झाली. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप यंदा ९ वर आला. गेल्या निवडणुकीत ९२ टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला यंदा केवळ ३२ टक्के जागांवर यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १७ सभा झाल्या. त्या १४ जागांवर भाजपचे उमेदवार पराभूत झाले. लोकसभेतील विजयी उमेदवारांची संख्या विचारात घेतल्यास भाजप तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.

गेल्या तीन वर्षांत राज्यातील दोन मोठे प्रादेशिक फुटले. या पक्षांमधला मोठा गट भाजपसोबत गेला. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं. पण मतदारांनी महायुतीला थेट दणका दिला. भाजपच्या १४ जागा कमी झाल्या. अनेक दिग्गज नेत्यांना, मंत्र्यांना पराभव पाहावा लागला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विदर्भात भाजपला प्रचंड मोठा धक्का बसला. तिथे भाजपच्या केवळ २ जागा निवडून आल्या.
Uddhav Thackeray: ठाकरेंना नडला ‘सुभेदार पॅटर्न’, शिंदेंनी रिपीट केला राणे फॉर्म्युला; बालेकिल्ला कसा निसटला?
दिग्गज भुईसपाट होत असताना भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी १०० टक्के कामगिरी केली. त्यांच्याकडे पालघर, सिंधुदुर्ग, रायगड या तीन मतदारसंघांची जबाबदारी होती. या तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंना निवडून आणत चव्हाणांनी तळ कोकणात कमळ फुलवलं. ठाकरेसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव घडवून आणला.

पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा, रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेंनी विजय मिळवला. इथेही चव्हाणांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कल्याण, ठाण्यातही महायुतीला शत प्रतिशत यश मिळालं. त्यामुळे चव्हाण भाजपसाठी किंगमेकर ठरले. डोंबिवली, पालघर, सिंधुदुर्गमधील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या व्हॉट्स ऍप स्टेटसवर चव्हाण किंगमेकर असे स्टेटस ठेवले. रायगडमध्ये तशा आशयाचे पोस्टर्सही झळकले.