अडीच वर्षांत पापाचा कडेलोट, म्हणून ते प्रयागराजला गेले – राऊतांचा शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल

राऊतांचा शिंदेंवर पुन्हा हल्लाबोलImage Credit source: social

राज्यात मर्सिडिजवरून राजकीय गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल त्यांच्या मंत्र्यासह महाकुंभ मेळ्यात पोहोचले. त्यांनी त्रिवेणी संगमावर जाऊन स्नानही केलं. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजला गेले होते, तर त्यानंतर लगेचच शिदेंनीही कुंभमेळ्याचा दौरा आखला. मात्र त्यांच्या या शाही स्नानावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. अडीच वर्षात मोठं पाप केलं. पापाचा कडेलोट झाला म्हणून शिंदे गट प्रयागराजला गेले, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर पुन्हा हल्ला चढवला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यावरून राऊतांनी शिंदेंवरह टीकास्त्र सोडलं होतं. तर आता पुन्हा राऊतांनी शिंदेंच्या प्रयागराजमधील शाही स्नानाच्या मुद्यावरूनही हल्ला चढवला.

काय म्हणाले संजय राऊत ?

समर्थ रामदासांनी मूर्खांची 10 लक्षणे सांगितली आहे. ही सर्व लक्षणे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या लोकांमध्ये दिसत आहे. काल पवार साहेबांनी सांगितलं. मूर्खच आहेत ही लोकं. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. ते सर्व भ्रष्ट आहेत. त्यांचे गुन्हे उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. एकनाथ शिंदेंसह सर्वांचे गुन्हे पोटात घातले. आम्ही त्यावरून त्यांना सांगायचो आपल्याला त्रास होईल. हे सर्व लोकं एकनाथ शिंदेंसोबत आहेत. या प्रत्येकाला उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांनी भरभरून दिलंय, असं राऊत म्हणाले.

आता तुम्ही गेला ना. तिकडे काम करा. काल फडणवीस यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलं पीए आणि ओएसडी नेमण्याबाबत, जी 16 लोकांची यादी आली ते 16 जण दलाल आणि फिक्सर होते. मुख्यमंत्री आणि मुख्यसचिवांनी अशा दलाल आणि फिक्सरची नावे पाठवली होती नावे जाहीर करा. राज्याच्या हितासाठी ही नावे जाहीर करा. हे सर्व मंत्री शिंदे गटाचे आहेत, अशी माहिती आहे, असेही राऊत यांनी म्हटलं. शिंदेंचा पक्ष हा अमित शाह यांचा पक्ष आहे. हे फिक्सर शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून गेले. तसं नसतं तर फडणवीस बोलले नसते. माझ्याकडे हे 16 लोकांची नावे आहेत. 13 शिंदेंचे आहेत आणि उरलेले अजित पवार गटाचे आहेत, असा दावा राऊतांनी केला.

म्हणून शिंदे प्रयागराजला गेले

अजित पवार यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचं पालन करतात. अजित पवार पाप धुवायला प्रयागराजला गेले नाही. राज्यातही पवित्र नद्या आहेत, हे त्यांना माहीत आहे. अडीच वर्षात मोठं पाप केलं. पापाचा कडेलोट झाला म्हणून शिंदे गट प्रयागराजला गेले,असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं.

देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार

मुख्यमंत्र्यांनी फिक्सर टाळले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. ते कठोर निर्णय घेतात. आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हितासाठी त्यांनी घेतलेले निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो. शिंदेंचं घटनाबाह्य सरकार असताना आर्थिक अराजक माजवलं गेलं. टेंडर निघण्याआधीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जात होते. अशा कामांना फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. त्यांनी लूट रोखली आहे. ठेकेदारीतून मिळालेला पैसा राजकारणात टाकायचा, राजकारणातून परत भ्रष्टाचार. हे चक्र फडणवीस थांबवत आहेत, असे राऊत म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)