तत्पूर्वी, या सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी तपासातील प्रगती अधोरेखित करताना रक्ताचे बदललेले नमुने आईचेच असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली. हा महत्त्वाचा पुरावा असून, त्या अनुषंगाने या प्रकरणात सर्व अटक आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. मोबाईलच्या डेटा आणि कॉल्सच्या विश्लेषणातून आणि साक्षीदारांच्या चौकशीतून नवनवीन पुरावे समोर येत आहेत. त्यातून सर्व आरोपींचा सहभाग निष्पन्न करून गुन्ह्याची साखळी उलगडायची आहे, असे तपास अधिकारी तांबेंनी न्यायालयात सांगितले.
या प्रकरणात अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या नवीन आरोपींना दहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यापैकी अमोल गायकवाड हा मंगळवारी दिवसभर रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला बुधवारी ‘डिस्चार्ज’ मिळाला असून, त्याच्यासह सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी केला. आरोपींतर्फे अॅड. सुधीर शहा, अॅड. ऋषिकेश गानू, अॅड. विपुल दुशिंग आणि अॅड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
‘आरोपी अनेक दिवसांपासून पोलिस कोठडीत असून, प्रत्येक वेळी नवीन अटक झाल्यावर एकत्रित चौकशीच्या नावाखाली पोलिस कोठडीत वाढ मागितली जात आहे. आरोपींची घरझडती पूर्ण झाली असून, त्यांचे मोबाइलही जप्त आहेत. त्यामुळे वाढीव कोठडीसाठी पोलिसांकडून जुनीच कारणे दिली जात आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली, तरी ते तपासात सहकार्य करतील,’ असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली.
जामिनावर दहा जूनला सुनावणी
अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल आणि अपघाताच्या घटनेपूर्वी या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना वयाची खातरजमा न करता मद्य पुरविल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पबमालक व कर्मचाऱ्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून, त्यावर पोलिसांनी आपले म्हणणे शनिवारी सादर केले. या अर्जावर आता दहा जूनला सुनावणी होणार आहे.
कोठडी अस्वच्छ असल्याची तक्रार
शिवानी अगरवालला फरासखाना पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. तेथील अस्वच्छतेमुळे कोठडीत राहणे असह्य होत असल्याची तक्रार शिवानीने सुनावणी संपल्यावर केली. त्यावर न्यायालयाने वकिलामार्फत तक्रार नोंदविण्यास सांगितले आहे.