बुधवारी सकाळी अजित पवार यांनी रायगडचे विजयी उमेदवार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी कुणालाही भेट दिली नाही. बारामतीच्या लढतीत अजित पवार यांनी परिश्रमाची पराकाष्ठा केली होती, मात्र त्यात यश न मिळाल्याने ते काहीसे नाराज असल्याचे पक्षातील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. बारामतीनंतर पवार यांनी शिरुरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विजयासाठीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तेथेही लाखभराहून अधिक फरकाने पराभव पदरी पडला.
परिणामी, बुधवारी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीला न जाणे पवार यांनी पसंत केले. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे या बैठकीला हजर होते.
– पराभवावर होणार मंथन
– बैठक वादळी ठरण्याची शक्यता
– दिल्लीतील एनडीएच्या बैठकीलाही दांडी
मित्रपक्षांनी मदत न केल्याबद्दल नाराजी
निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीवर मंथन करण्यासाठी उद्या, शुक्रवारी पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते, खासदार आणि आमदार यांची बैठक बोलावण्यात आली आहे. निवडणुकीत महायुतीकडून मदत न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असताना ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभा जागेची आगामी निवडणूक, विधान परिषद निवडणूक आणि काही महिन्यांत लागणारी विधानसभा निवडणूक याविषयीही या बैठकीत चर्चा होऊन रणनीती ठरणार आहे.