काँग्रेसमध्ये आजवरचा सर्वात मोठा राजकीय भूकंप? अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेल्या नेत्याचा थेट इशारा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळातील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफ सरकारची प्रशंसा केल्यामुळे काँग्रेसचे खासदार शशि थरूर पक्षाच्या रडारवर आले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेल्या शशि थरूर यांच्यावरच आता पक्षातून टीका होत असल्याने थरूर यांनीही पलटवार करत थेट इशारा दिला आहे. मी पक्षासाठी उपलब्ध आहे. पण माझ्या सेवेची पक्षाला गरज नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे, असा थेट इशाराच शशि थरूर यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आजवरचा सर्वात मोठा राजकीय भूकंप येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

इंडियन एक्सप्रेस मलयालम (IE Malayalam)च्या पॉड कास्टमध्ये बोलताना शशि थरूर यांनी हा इशारा दिला आहे. थरूर यांनी इशारा दिला असला तरी पक्ष सोडण्याच्या अफवांचं त्यांनी खंडनही केलं आहे. भलेही विचारांमध्ये मतभेद असतील, पण काँग्रेस सोडण्याच्या बाबत आम्ही विचार करू शकत नाही, असंही शशि थरूर यांनी सांगितलंय. दरम्यान, थरूर यांनी सारवासारव केली असली तरी त्यांच्या इशाऱ्यातून अनेक अर्थ निघत असून राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.

‘एवढेही संकुचित विचार नाहीये’

शशि थरूर यांनी आधी केरळ सरकारच्या धोरणांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली त्याचंही थरूर यांनी कौतुक केलं आहे. मात्र, थरूर यांचे हे बोल काँग्रेसला बोचले. थरूर यांनी केरळच्या पार्टीच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतरही पक्षाच्या मुखपत्रातून थरूर यांच्यावर टोले लगावण्यात आले होते. याबाबत थरूर यांना विचारण्यात आले. विरोधकांचं तुम्ही कौतुक का केलं? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी राजकीय नेता म्हणून विचार करत नाही. माझे विचार इतकेही संकुचित नाहीयेत, असं थरूर यांनी स्पष्ट केलं.

एजन्सींचा दिला हवाला

काँग्रेसने नवीन मतदारांना पक्षासोबत जोडावं आणि केरळमध्ये आपले मतदार वाढवले पाहिजेत, असं आवाहन थरूर यांनी केलं. केरळ राज्यात पक्षाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे, या माझ्या मताशी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी समर्थन दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी थरूर यांनी विविध एजन्सीच्या सर्व्हेचाही हवाला दिला. हा सर्व्हेही पक्षाचं राज्यातील नेतृत्व बदलावं असंच सांगत असल्याचं थरूर यांचं म्हणणं आहे.

दुसरा इशारा काय?

तिरुवनंतपूरममधून चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या थरूर यांनी आणखी एक मोठा इशारा दिला आहे. काँग्रेसने केरळमध्ये आपला व्होटर बेस वाढवला नाही तर तिसऱ्यांदा विरोधी पक्षात बसावं लागेल, असा इशारा थरूर यांनी दिला आहे. पुढच्यावर्षी केरळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर थरूर यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)