प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेमुळे सलग तिसऱ्या दिवशी लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. बुधवारीही दिवसभर लोकल विलंबाने धावत असल्याने मुंबईकरांची फरफट झाली.सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०/११वरून २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉकनंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित झाली खरी, मात्र नव्या यंत्रणेमुळे लोकलसेवेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून आले. सलग तिसऱ्या दिवशी लोकलफेऱ्या विलंबाने धावत होत्या. परळ ते सीएसएमटीदरम्यान लोकल धीम्या गतीने धावत असल्याने बुधवारीही वेळापत्रक कोलमडलेलेच होते. याचा सर्वाधिक फटका सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलसेवेला बसला. लोकलसेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नवीन सिग्नल यंत्रणेतील दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. त्यामुळे आणखी काही दिवस लोकलविलंब कायम असणार आहे.