शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात. या टीकेला आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी संजय राऊत यांना चांगलंच सुनावलं आहे. संजय राऊत यांना सकाळी उठून आरोप करण्याची सवय लागलेली आहे, मुळात संजय राऊत यांच्या आरोपांना कोणीही गंभीर्याने घेत नाही आणि एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेण्याची काही गरज नाहीये, ते डॉक्टर आहेत कशा पद्धतीने ते ऑपरेशन करतात हे संजय राऊत यांनी चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे, असा हल्लाबोल मनिषा कायंदे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मुळात संजय राऊत हे शिवसेनेच्या आमदारांच्या मतावर खासदार झालेले आहेत, त्यांची इतकी हिंमत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मग वाटेल ते बोलत बसावं. आम्हाला तर एवढं पण सांगण्यात आलेलं आहे की ऑपरेशन टायगरमुळे संजय राऊत हे व्यथित झालेले आहेत, ते फस्ट्रेट झालेत त्यांना आता ना उद्धव ठाकरे जवळ उभा करत ना शरद पवार, असा घणाघात यावेळी मनिषा कायंदे यांनी केला आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व आमदार खासदारांसह कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणार आहेत, यावर देखील कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे लवकरच कुंभमेळ्याला जाणार आहेत, या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार असतील, असं कायंदे यांनी म्हटलं आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर देखील कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करायची की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, ही मुळात त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे, त्यामुळे ते योग्य ते निर्णय घेतील, असंही यावेळी मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.