लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत इथे महायुतीचा महाविजय कसा होणार, हे गणित आकडेवारीसह सांगितले होते. मागील निवडणूकीत अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते. तेव्हा भाजप उमेदवार कांचन कुल यांना १ लाख ५५ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांना साडे पाच लाख मते मिळाली होती. आता अजित पवार आमच्यासोबत आहेत. त्यांची साडे तीन लाख हक्काची मते आहेत. भाजपची मते आणि प्लस अजित पवार यांची मते विचारात घेतली, तर आम्ही दोन लाखांनी विजयी होवू असे गणित चंद्रकांत पाटील यांनी मांडले होते. हे गणित प्रत्यक्षात फोल ठरलं. शरद पवार यांचा पराभव आमच्यासाठी अधिक वजनदार आहे, असे म्हणणाऱ्या भाजपला बारामती जिंकणे यंदाही शक्य झाले नाही.
undefined
undefinedअजित पवार यांचे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व आहे. जिल्ह्याचे ते अनेक वर्षे पालकमंत्री राहिले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यावर त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. जिल्हा बॅंकेसह महत्वाच्या संस्था त्यांच्याकडे आहेत. यंदाच्या निवडणुकीचा विचार करता बारामतीत ते स्वतः, इंदापूरला राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील, दौंडला विद्यमान आमदार राहूल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुरंदरला माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, खडकवासल्यात आमदार भीमराव तापकीर अशी तगडी फौज अजितदादांकडे होती. पण या फौजेच्या बळावर ते पत्नी सुनेत्रा यांना विजयापर्यंत घेवून जावू शकले नाहीत.
खडकवासला वगळता अन्य पाचही तालुक्यात सुप्रिया सुळे यांना मोठे मताधिक्य मिळाले. ही तेथील आजी-माजी आमदारांसाठीही धोक्याची घंटा आहे. भाजप, शिंदे सेना, रिपाई, मनसे यासह अनेक मित्रपक्षांची ताकद असतानाही अजित पवार यांना आपल्या उमेदवाराला निवडून आणता आले नाही, याची चर्चा आता मतदारसंघात सुरु आहे.
शरद पवार यांची या वयात साथ सोडून भाजपसोबत सत्तेत जाणे, प्रचार काळात शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यावर जहरी टीका करणे अजित पवार यांना भोवले. संसदरत्न सुप्रिया सुळे यांचे यापूर्वी जाहीर भाषणातून कौतुक करणाऱ्या अजित पवार यांनीच यंदा प्रचारात खासदार निष्क्रिय असल्याचे सांगितले. त्यावर जनतेने तुमचे आधीचे बोलणे खरे की आत्ताचे हा प्रश्न केला. ठराविक चौकटीत अजित पवार बांधले गेले आहेत. त्यांच्या भोवती ठराविक लोक आणि ठेकेदारांचे असणारे कोंडाळे जनतेला पटले नाही. त्याची परिणिती सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यात वाढ होण्यात झाली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आकडेवारी
दौंड
सुप्रिया सुळे : ९२,०६४
सुनेत्रा पवार : ६५,८२७
इंदापूर
सुप्रिया सुळे : १,१४,०२०
सुनेत्रा पवार : ८८,०६९
बारामती
सुप्रिया सुळे : १,४३,९४१
सुनेत्रा पवार : ९६,५६०
पुरंदर
सुप्रिया सुळे : १,२५,९४८
सुनेत्रा पवार : ९०,६६७
भोर
सुप्रिया सुळे : १,३४,२४५
सुनेत्रा पवार : ९०,४४०
खडकवासला
सुप्रिया सुळे : १,२१,१८२
सुनेत्रा पवार : १,४१,९४८