SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. पेपर फुटी प्रकरणात नेमके काय झाले, त्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. शुक्रवारी जालना आणि यवतमाळमध्ये दहावीचा मराठीचा पेपर फुटल्याचे उघड झाले.
दोन्ही प्रश्नपत्रिकेत भिन्नता?
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणाबाबत बोलताना शिवसेना नेते व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, पेपर फुटीसंदर्भात प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात पेपराची हस्तलिखित प्रत बाहेर आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच परीक्षेचा पेपर आणि बाहेर आलेले हस्तलिखित यात प्राथमिक पातळीवर भिन्नता आहे. तरी त्याची दखल घेवून सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीत जे पुढे येईल, जी वास्तवता असेल त्यानुसार करवाई केली जाईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.
समाज माध्यमातून चित्रफिती
विषय मराठी असो की कोणताही असो कॉपीमुक्त अभियानाची सूचना करण्यात आली होती, असे सांगत दादा भुसे म्हणाले की, राज्यात कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाने सर्व विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. आता काही ठिकाणी कॉपी झाली. कॉपी पुरविण्याचे प्रकार समोर आले. याबाबतच्या चित्रफितीही समाज माध्यमातून पुढे आल्या. त्याची निश्चितपणे गंभीर दखल शासन स्तरावर घेतली आहे.
ती केंद्र रद्द करणार
विद्यार्थी व सर्व विभागाने कोणताही दबाव न घेता परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करत मंत्री दादा भुसे म्हणाले, ज्या केंद्रावर यापूर्वी कॉपी झाले ते केंद्र रद्द करण्यात आले आहे किंवा त्यात बदल करण्यात आला आहे. तसेच काही केंद्रावरील प्रशासन देखील बदलण्यात आले आहे. त्यानंतरही कॉपीचे प्रकार समोर आले असतील तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. कॉपी पुरविणाऱ्यावर कारवाई केली जाईल. कॉपीसाठी सहकार्य करणाऱ्या कर्माचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. येणाऱ्या काळात ती केंद्र दहावीच्या परिक्षेसाठी रद्द केले जातील, असे दादा भुसे यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी मेहनत घेतात. त्यांच्या सोबत शिक्षक समर्पित भावनेतून ज्ञानदानाचे काम करीत असता. त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. यामुळे कॉपीचा प्रकार कुठेही खपवून घेतला जाणार नाही, असे दादा भुसे यांनी सांगितले.
हे ही वाचा…
दहावीची बोर्डाचा पेपर फुटला, परीक्षा मंडळाचे सर्व दावे फोल, कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा