शेकडो नेते, हजारो पदाधिकारी आणि लाखो सक्रीय कार्यकर्ते असूनही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा वारू महाविकास आघाडीने अतिशय प्लॅनिंगने रोखला. भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी रात्री चिंतन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये विधानसभानिहाय आढावा घेण्यात आला. कोणत्या मतदारसंघात कुठे कमी पडलो, याची माहिती संबंधित नेत्यांनी शीर्षस्थ नेत्यांना दिली. त्यानंतर बुधवारी दुपारी फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची तयारी दाखवली. फडणवीस यांच्या या पावलानंतर महाराष्ट्र भाजपने तातडीची पत्रकार परिषद घेतली.
फडणवीस म्हणाले, जबाबदारीतून मोकळं करा, बावनकुळे म्हणाले….
बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची पक्षासाठीची भूमिका नेहमीच त्यागाची राहिलेली आहे. पक्षसंघटनेसाठी नेहमी त्याग करण्याची त्यांची भूमिका असते. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराजयाला केवळ ते एकटेच जबाबदार नाही. तर आम्ही सगळेच जबाबदार आहोत. परंतु त्यांनी सरकारमधून बाहेर जाण्याची काही एक गरज नाही. त्यांनी सरकारमध्ये राहून आम्हाला पक्षसंघटनेसाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती भाजपच्या कोअर कमिटीने फडणवीस यांना केल्याची माहिती बावनकुळे म्हणाले.
आता रोडमॅप तयार करणार
पुढच्या काळात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि महायुतीला चांगलं यश मिळेल, असा रोडमॅप तयार करू. महायुती आणि भाजपची टीम ही मतांची टक्केवारी कशी वाढेल, जनतेचे प्रश्न कसे सुटतील, यावर काम करेन, असे बावनकुळे यांनी सांगितले.
फडणवीस यांचा निर्णय अंतिम नाही, ते केंद्राशी बोलणार आहेत…
सरकारमध्ये राहून देवेंद्रजी जोपर्यंत आमच्या पाठीमागे ताकदीने उभे आहेत, तोपर्यंत आम्ही जोमाने काम करू. त्यांची सरकारच्या बाहेर जाण्याची तयारी ही कालच्या निकालातून आलेली होती. दु:खातून त्यांनी भावना व्यक्त केली, परंतु त्यांनी हा अंतिम निर्णय आहे, असे न सांगता केंद्राशी बोलून निर्णय घेईन, असेही सांगितले, याकडे बावनकुळेंनी लक्ष वेधले.