किस्सा खुर्ची का ! माजी आमदारास व्यासपीठावर खुर्ची, पण विद्यामान खासदारास खुर्चीविना राहावे लागले उभे

Dhairyashil Mohite Patil: राजकारणाचा सर्व खेळ खुर्चीवर असतो. प्रत्येक राजकारणात असलेल्या व्यक्तीला खुर्चीचे वेध लागले असते. मग ग्रामपंचायतीपासून सुरु झालेली खुर्चीची अपेक्षा वाढत जावून राज्याच्या विधिमंडळ आणि देशाच्या संसदेपर्यंत जाते. परंतु सोलापुरात विद्यामान खासदारासंदर्भात वेगळाच किस्सा घडला. आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष पहायला मिळाला. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात विद्यामान खासदारांना बसण्यासाठी खुर्चीच मिळाली नाही. त्याचवेळी माजी आमदार खुर्चीवर बसून होते. कार्यक्रमात विद्यामान खासदार उभे आणि माजी आमदार, माजी खासदार खुर्चीवर बसलेले होते. या विषयाची चर्चा चांगलीच रंगली.

नेमका काय घडला प्रकार

सोलापुरात बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील होते. कार्यक्रमात इतर सर्वांना खुर्ची मिळाली. पण माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील हे चौघे खुर्चीवर बसलेले होते. परंतु विद्यमान खासदारांना बसण्यासाठी खुर्ची मिळाली नाही. माजी आमदार दीपक साळुंखे यांनाही या कार्यक्रमादरम्यान उभे राहावे लागले. हे दोन्ही नेते उभे असल्याचे लक्षात आल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना खुर्ची उपलब्ध करून दिली. दरम्यान या उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी-माजींचे मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले.

आपण दोन्ही माजी झालो…

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, शाहाजी बापू आणि माझी कारकीर्द सेम झाली. ते माजी आमदार आणि मी माजी खासदार झालो आहे. आम्ही आमदार, खासदार असताना शब्द दिला होता की सांगोल्याला पाणी देणार आहोत. आज माजी असतानाही दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला. आता या योजनेला 300 कोटी मंजूर झाले आहेत. पण त्यासाठी 1500 कोटी लागणार आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, दुष्काळ मिटण्याचा हा दिवस आज दोन्ही नेत्यामुळे आला. या पाण्याचे श्रेय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आहे. या पाण्यासाठी संघर्ष करणारे बाळासाहेब विखे यांचे वारसदार, हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि प्रत्यक्ष पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणारे शहाजी बापू आहेत, असे गोरे म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)