मागील निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवत २३ जागांवर बाजी मारली. यंदा भाजपनं २८ जागा लढवल्या. त्यामुळे भाजपच्या जागा वाढतील किंवा आहेत त्या जागा कायम राहतील, असा अंदाज होता. पण भाजपला एक आकडी जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. याचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसू शकतो.
लोकसभा निवडणूक संपताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागावाटपाचा विषय काढला. त्यावर उत्तर देताना भाजप राज्यात सर्वाधिक जागा लढवेल, असं म्हटलं. लोकसभेच्या स्ट्राईक रेटचा विचार विधानसभेच्या जागावाटपावेळी करण्यात येईल, या फॉर्म्युल्याची चर्चा झाली. या स्ट्राईक रेट फॉर्म्युलाचा फटका आता भाजपलाच बसेल अशी दाट शक्यता आहे.
महायुतीची कामगिरी कशी?
२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी स्ट्राईक रेट कसा वाढला याची आकडेवारी वाचली. आता फडणवीसांच्या आवडत्या फॉर्म्युलानुसार भाजपचा स्ट्राईक रेट काढला तर भाजपची कामगिरी शिंदेसेनेपेक्षा वाईट आहे. भाजपनं सर्वाधिक २८ जागा लढवल्या. पैकी केवळ ९ जागा जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट फक्त ३२.१४ इतका आहे. गेल्यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट तब्बल ९२ होता.
महायुतीमधील शिंदेसेनेला हक्काच्या जागा मिळवण्यासाठीदेखील बराच संघर्ष करावा लागला. मात्र तरीही त्यांची कामगिरी चांगली झाली. १५ जागा लढवून त्यांना ७ जागांवर यश मिळालं. त्यांचा स्ट्राईक रेट ४६.६६ राहिला. महायुतीत सर्वाधिक खराब कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. ५ जागा लढवून त्यांना केवळ १ जागा मिळवता आली. त्यांचा स्ट्राईक रेट २० राहिलाय. फोडाफोडीच्या राजकारणाचा थेट फटका भाजपला बसला आहे. याचे पडसाद आगामी विधानसभेत आणि त्यावेळी होणाऱ्या जागावाटपात दिसतील. लोकसभेला तब्बल २८ जागा लढवून केवळ ९ जागा जिंकणारा भाजप विधानसभेला किती जागांवर लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.