भाजपबरोबर सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये गेले होते. त्या भेटीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरेंनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ‘आम्ही सत्तेत गेल्यानंतर पवार साहेबांना भेटायला गेलो. मंत्र्यांसह आपण पवार साहेबांना भेटायला जायचंय, असं मला राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्षांकडून सांगण्यात आलं होतं. आधी मंत्र्यांसोबत साहेबांना भेटलो. मग सांगण्यात आलं आमदारांसह भेटायला जायचंय. त्याची स्क्रीप्ट कोणाची होती ते माहीत नाही. पण त्या स्क्रीप्टचा शेवट मला सांगण्यात आला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पवार साहेब पाठिंबा देणार होते. प्रफुल पटेल यावर अधिक प्रकाश टाकू शकतील,’ असं तटकरेंनी सांगितलं. आम्ही स्वत:हून भेटायला गेलो असं कोणीतरी सांगितलं. पण वेळ ठरल्याशिवाय भेटायला जाता येतं का, असा प्रश्न विचारत ही भेट दोन्ही बाजूनं होती. वन वे नव्हती, असं तटकरेंनी स्पष्ट केलं. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत तटकरेंनी अनेक गोष्टींचा तपशीलवार खुलासा केला.
शरद पवारांच्या नेतृत्त्वात झालेल्या बैठकांमध्ये अनेकदा भाजपसोबत जाण्याबद्दल अनेकदा चर्चा झाली. अमित शहांसोबतही आमचा संवाद झालेला होता, असं म्हणत तटकरेंनी संपूर्ण टाईमलाईन सांगितली. ‘२०१४ मध्ये आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली. २०१६ च्या अखेरीस आणि २०१७ च्या प्रारंभी आमचं भाजपसोबत राज्यातील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटप पूर्ण झालं होतं. आमच्या मंत्र्यांची संख्या, खाती, पालकमंत्र्यांचे जिल्हे सगळं ठरलं होतं,’ असा दावा तटकरेंनी केला.
‘२०१७ मध्ये गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मी दिल्लीत होतो. पवार साहेब, अमित शहा आणि अजून एक मध्यस्थ होते. त्यांच्याकडे बैठक झाली. नितीश कुमारांसारखं करायचं एवढाच विषय आमच्यासमोर होता. याबद्दलचा प्रस्ताव मला मांडण्यास सांगण्यात आला. पण शहांनी सेनेबद्दलची त्यांची भूमिका लगेचच स्पष्ट केली. ‘तटकरेजी शिवसेना सोबत राहील. तुम्ही सत्तेत आल्यावर जर शिवसेनेला बाहेर पडायचं असेल तर सेना बाहेर पडेल. पण आम्ही त्यांना बाहेर काढणार नाही. कारण शिवसेना आमचा जुना मित्र पक्ष आहे. वाजपेयी, अडवाणीजींनी त्यांना एनडीएमध्ये आणलं आहे’ असं शहा म्हणाले होते. त्यावेळी आम्ही नकार दिला. अन्यथा आम्ही २०१७ मध्ये मुहूर्त काढलाच होता. पितृपक्षाच्या आत आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. यातलं एकही वाक्य खोटं नाही. सेनेला बाहेर ठेवण्यासाठी आम्ही भाजपला एक महिना दिला होता. दीड महिना वाट पाहिल्यानंतर आम्ही स्वतंत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला,’ असा घटनाक्रम तटकरेंनी कथन केला.