13 जानेवारी 2025 रोजी महाकुंभला सुरुवात झाली होती. यामध्ये अनेक साधू संतांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. अशातच या कुंभमेळ्याची 26 फेब्रुवारी 2025 रोजी समाप्ती होणार आहे. त्यामुळे अनेक आखाडे आणि संतांचा या दरम्यान निरोप घेण्यात आला. या कुंभमेळ्यात अनेक साधू-साध्वी हे खास करून तीन अमृत स्नानात सहभागी होण्यासाठी येतात. यातील शेवटचे स्नान बसंत पंचमीला झाले.
त्यानंतर प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातून आखाडे आणि नागा साधूंचे प्रस्थान सुरू झाले आहे. आपापल्या आखाड्यात, हिमालयात किंवा इतर ठिकाणी तपश्चर्येसाठी परत जाऊ लागलेत. परंतु एक गोष्ट म्हणजे त्यानंतरही प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरूच आहे. मात्र दुसरीकडे या मेळ्यात निरोपाच्या आधी साधू-संत कढी पकोड्याची चव चाखतात. त्यांच्यासाठी हे जेवण कोण बनवते आणि नेमकी ही परंपरा काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर चला जाणून घेऊयात.
खरं तर कुंभमेळ्यातील आखाड्यातील संतांच्या निरोपापूर्वी कढी पकोडा बनविण्याची परंपरा फार जुनी आहे. ही परंपरा विशेषत: न्हावी समाजातील काही कुटुंबीय एकत्र येत त्यांच्यासाठी जेवण बनवतात. कुंभमेळ्यात न्हावी समाजातील लोकं आखाड्यातील संतांची सेवा करतात. यावेळी संतांना निरोप देताना त्यांच्यावतीने कढी पकोडा बनवून त्यांना खायला दिले जाते.
या सेवेसाठी कुंभमेळ्यातील प्रत्येक साधू आणि साध्वी न्हावी कुटुंबातील लोकांना आशीर्वाद देतात आणि भेटवस्तू देतात. या परंपरेतून गुरु-शिष्य आणि सेवक-गुरू यांच्या नात्यातील जिव्हाळाही दिसून येते. कुंभमेळ्यात प्रत्येक आखाड्यात ही परंपरा पाळली जाते. कुंभमेळ्यात आखाड्यातील साधू- संतांच्या निरोपापूर्वी तयार होणारी कढी पकोडी खूप मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. त्याचे प्रमाण प्रामुख्याने आखाड्याचा आकार, त्यात राहणाऱ्या संतांची संख्या आणि त्यांचे सेवक यावर अवलंबून असते.
किती प्रमाणात कढी- पकोडे बनवले जाते?
छोट्या आखाड्यात सुमारे 50-100 लिटर कढी तयार केली जाते.
मोठय़ा आखाड्यात 200-500 लिटर च्या प्रमाणात कढी तयार केली जाते.
खूप मोठ्या आखाड्यांमध्ये कढीचे प्रमाण 1000 लिटर (1 टन ) च्या प्रमाणात कढी तयार केली जाते.
– प्रत्येक आखाड्यात उपस्थित असलेल्या साधू-संतांच्या संख्येनुसार कढी- पकोड्याचे प्रमाण ठरवले जाते.
– कुंभमेळ्याला लाखो भाविक येतात. त्यामुळे अनेकदा हा कार्यक्रम हजारो लोकांसाठी सुद्धा आयोजित केला जातो.
– त्यामुळे संतांच्या निरोपासाठी हा केवळ पदार्थ नसून शुभ विधी मानला जातो.