उद्धव ठाकरे यांचे तीन बडे शिलेदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी भाजप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या तीन पक्षांमध्ये अचंबित वाटणाऱ्या राजकीय हालचाली घडला. सकाळी मनसे नेते राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे तीन मोठे शिलेदार दुपारी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे राज्यातील राजकारणात या गोष्टींची चर्चा सुरु झाली असून वेगवेगळे अर्थ काढले जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे हे शिलेदार सागर बंगल्यावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचे तीन प्रमुख शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी दाखल झाले. त्यात मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, अंबादास दानवे यांचा समावेश होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दादारमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी ही भेट झाल्याचे खासगीरित्या या नेत्यांकडून सांगण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी ही भेट होती. भेटीनंतर या तिन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. अंबादास दानव यांनी बोलण्याचे टाळले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात ही भेट होती की इतर कोणते राजकीय कारण होते? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे-फडणवीस भेटीचा अर्थ काय?

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे प्रमुख शिलेदार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट या सर्व घडामोडींचा अर्थ वेगवेगळा काढला जात आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक होती, असे आता भजपा नेते सुधीर मुनगंटीवार सांगत आहेत. परंतु राजकीय निरीक्षक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढत आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच विधानसभा निवडणुकी निकालाबाबत शंका उपस्थित केली होती.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)