राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका देत भाजपचा अश्वमेध रोखून धरला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ७ उमेदवार, काँग्रेसचे जवळपास १० उमेदवार तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे देखील ९ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. दुसरीकडे देशात इंडिया आघाडीने एनडीएला जोरदार धक्का देत २२९ जागांवर आघाडीवर आहे. दुपारपर्यंतचे कल पाहून शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केले.
हिंदी पट्ट्याची आम्हाला चिंता होती पण….
शरद पवार म्हणाले, निवडणुकीसाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. संघटनेच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. या निकालाने परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्राचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असा निकाल आहे. यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि त्या भागांत खूप मोठं मार्जिन असायचे. पण आताच्या निकालानुसार तिथे मर्यादित मार्जिन आहे. याचा अर्थ उत्तर प्रदेश आणि दिल्ली बेल्टमध्ये आमच्या सहकाऱ्यांनी काम केले, तिथे अधिक लक्ष दिले तर तो भाग आमच्यासाठी इथून पुढच्या काळात अनुकूल असेल.
खरगे-येचुरी यांच्याशी चर्चा केली
“हा निकाल बघितल्यानंतर मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी यांच्याशी चर्चा केली. उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल संदेश आम्हाला आज रात्री कळेल. दिल्लीत जाऊन सामूहिक चर्चा करून पुढचे धोरण ठरवू, असे सांगत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
सात जागांवर आमचे उमेदवार आघाडीवर, स्ट्राईक रेट चांगला
राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० जागा लढवल्या. सात जागांवर आमचे उमेदवार आघाडीवर आहेत. हे केवळ राष्ट्रवादीचे यश नाही, हे मविआचे यश आहे. सगळ्यांनी एकत्रित काम केल्याने हे यश मिळाले.
बारामतीच्या निकालावर बोलताना पवार म्हणाले…
बारामतीचा निकाल याच्यापेक्षा वेगळा असेल असे मला वाटले नव्हते. माझं ६० वर्षांचं काम आहे, माझीही सुरूवात तिथूनच (बारामती) झाली. बारामतीकरांची मानसिकता काय आहे, हे मला ठाऊक आहे. बारामतीकर योग्यच निर्णय देतील, हे मला माहिती आहे, असे बारामतीच्या निकालावर बोलताना पवार म्हणाले.