मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशात आणखी प्रगती केली असून राज्यात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचे वारे राज्यात वाहू लागल्यानंतर मुंबईतील वातावरणातही बदल होईल, अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारसाठी मुंबईत कोरड्या वातावरणाची शक्यता वर्तवली होती. मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवस मुंबईत कोरडे वातावरण असू शकेल. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणाच्या प्रभावाखाली मुंबईत पावसाची शक्यता मुंबईकरांना वाटत होती. मात्र सोमवारीही मुंबईत पावसाने हुलकावणी दिली. महामुंबई परिसरात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मात्र यामुळे तापमानात फारसा फरक पडला नाही. बुधवारपर्यंत मुंबईत असेच अंशतः ढगाळ वातावरण असेल. त्यानंतर गुरुवारपासून पावसाळी वातावरणाची मुंबईत जाणीव होईल, अशी शक्यता आहे. गुरुवारी मुंबईमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून शुक्रवारी मेघगर्जनेसह एखाद-दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. शनिवारी आणि रविवारीही मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
नवी मुंबईकरांचा जीव टांगणीला! दरडग्रस्त ठिकाणांची यादी अद्याप जाहीर नाही, मागील वर्षी २० घटनांची नोंदराज्यात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये आर्द्रता वाढल्याने पावसाचे प्रमाणही वाढू शकते. राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडताना वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याचे तुरळक जिल्हे वगळता उर्वरित राज्यात यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
तापमानाचा ताप
कोकण विभागात अजूनही कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने चढा आहे. उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक असले तरी हे तापमान या काळातील सरासरीच्या आसपास आहे. कोकण विभागात अलिबाग केंद्रावर सोमवारी सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी कमाल तापमानाचा पारा अधिक होता. डहाणू केंद्रावर २.९ तर रत्नागिरी केंद्रावर २.४ अंशांनी कमाल तापमान अधिक होते. मुंबईमध्ये सोमवारीही कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांहून अधिक होता. ७ जूनपर्यंत कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत असू शकेल तर त्यानंतर पारा आणखी एका अंशाने खाली उतरू शकेल. तापमानातील उष्णता कमी झाल्यानंतर किमान तापमानाचा पाराही खाली उतरू शकतो.