डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा, मानाच्या दोन्ही गदा  करणार परत, कारण काय?

यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात आली आहे. शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. चंद्रहार पाटील यांनी तसेच त्यांच्या बाबतीत घडलेल्या अन्यायाबद्दल खुलासा केला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आले हे कुस्तीगीर परिषदे मान्य करावे, अशी मागणी चंद्रहार पाटील यांनी केली आहे.

सांगली : यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. या लढतीदरम्यान झालेल्या राड्यावेळी शिवराज राक्षेने पंचांवर लाथ घातली. त्यानंतर फायनलमध्ये महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना मैदान सोडलं होतं. यानंतर कुस्तीगीर परिषदेने दोघांवरही तीन वर्ष निलंबनाची कारवाई केली. शिवराज राक्षेची पाठ टेकलेली नसताना कुस्ती देण्यात आल्याने सर्वत्र पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. अशातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

एका डिबेट कार्यक्रमामध्ये काका पवार, संदीप भोंडवे आणि शिवराज राक्षे होते, यावेळी २००९ ला माझा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सर्व पंच कमिटीने पराभव केला याबद्दल काका पवारांना विचारल्यावर त्यांनी मान्य केलं की चंद्रहारवर अन्याय झाला. शिवराज राक्षे हा त्यांचा पठ्ठा, त्याच्यावर अन्याय झाला की ते माध्यमांना सांगत आहेत. पण जेव्हा माझ्या बाबतीत हे घडत असताना तुम्ही तिथं हजर होते. शरद पवार साहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मला हरवल्यानंतर मी आत्महत्येच्या विचारत होतो. आजही मी कोणत्या कुस्तीच्या मैदानामध्ये जात नाही, कारण माझ्या मनामध्ये भीती बसली आहे. एखाद्या पैलवानाची अशी परिस्थिती का होते? असा सवाल करत आपल्या मनातील खदखद चंद्रहार पाटलांनी बोलून दाखवली आहे .

शिवराज राक्षेवर ही परिस्थिती आल्यावर काका पवारांना यांचं दु:ख कळालं. आज त्यांनी मान्य केलं की माझ्यावर अन्याय झाला होता. तशाच पद्धतीने त्यावेळच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावं की चंद्रहारवर अन्याय झाला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आलं. म्हणजे माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल नाहीतर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदांची गरज नाही. मी जे आजपर्यंत केलं ते प्रामाणिकपणे करून माताची सेवा करून या पदापर्यंत पोहोचलो होतो. अन्याय होऊन मी एखाद्या विशिष्ट विचारापर्यंत गेलो होतो. आयुष्यभर जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)