घाटकोपर पूर्व आणि पश्चिम, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, मानखुर्द शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाचे भांडुपमधून रमेश कोरगावकर आणि विक्रोळीमधून सुनील राऊत हे दोन आमदार आहेत. घाटकोपर पूर्वमधून राम कदम, घाटकोपर पश्चिममधून पराग शाह आणि मुलुंडमधून मिहीर कोटेचा हे भाजपचे, तर मानखुर्द शिवाजीनगरमधून समाजवाटी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत.
या मतदारसंघात मराठी मतदार साधारण चार लाख आहेत. गुजराती, मारवाडी मतदार पावणेतीन लाख असून त्यापाठोपाठ दोन लाख ७० हजार उत्तर भारतीय मतदार आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या दोन लाख ६० लाख इतकी आहे. तसेच दक्षिण भारतीयांची संख्याही लक्षणीय आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांची भिस्त मराठी आणि मुस्लिम मतांवर होती, तरी अन्य मते मिळवण्यासाठीही त्यांना प्रयत्न करावे लागलेत.
उमेदवार | पक्ष | विजय/पराभव |
संजय दिना पाटील | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | |
मिहिर कोटेचा | भाजप | |
नंदेश उमप | बसप | |
दौलत खान | वंचित बहुजन आघाडी | |
२०१४ पासून उत्तर पूर्व मुंबईवर भाजपचे वर्चस्व राहिले होते. २००९ मध्ये मनसेच्या शिशिर शिंदे यांना मिळालेल्या सुमारे दोन लाख मतांमुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सोमय्या हे चार हजार मतांनी पराभूत झाल्याने त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संजय दिना पाटील निवडून आले होते. २०१४ च्या मोदी लाटेत सोमय्या यांनी पाटील यांचा तीन लाख १७ हजार १२२ मतांनी पराभव केला. त्यावेळी सोमय्या यांना पाच लाख २५ हजार २८५ मते मिळाली होती.
१९८४ मध्ये काँग्रेसच्या लाटेत या जागेवरून गुरूदास कामत खासदार झाले होते. त्यानंतर १९८९ मध्ये भाजपच्या जयवंतीबेन मेहता, १९९१ मध्ये पुन्हा कामत, १९९६ मध्ये भाजपचे प्रमोद महाजन, १९९८ मध्ये पुन्हा कामत विजयी झाले. २००४ मध्येही कामतांनी येथून विजय मिळवला होता. २००९ मध्ये मात्र या जागेवर राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर पुन्हा ही जागा भाजपकडे गेली. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे मनोज कोटक यांना पाच लाख १४ हजार ५९९ मते मिळाली होती.
एकूण १६ लाख मतदार असलेल्या उत्तर पूर्व मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला नेहमीच भांडुपचा काही भाग, मुलुंड, घाटकोपरच्या काही भागातून चांगले मतदान होते. येथील मतदान भाजपसाठी नेहमीच निर्णायक ठरते. सन २०१९ मध्ये या भागातून ५७ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ते ५१ टक्के होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना मानखुर्द शिवाजीनगर, विक्रोळीबरोबरच, घाटकोपर आणि भांडुपमधील काही भागातूनही चांगले मतदान झाले होते. महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे सध्या भाजपचे मुलुंडमधील आमदार आहेत. मुलुंडबरोबरच घाटकोपरमध्ये असलेल्या गुजराती आणि उत्तर भारतीयांची मते भाजपच्या पारड्यात पडत असल्याने येथील मते त्यांना हमखास मिळण्याची शक्यता होती.
याआधी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवलेल्या पाटील यांना भाजपचे वर्चस्व असलेल्या पट्ट्यात मते मिळवण्यासाठी बरेच झगडावे लागले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे मते विभागली जाण्याची शक्यता होती. घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकरनगर, विक्रोळी कन्नमवार नगरसह भांडुपमधील काही भागांतून काही मते मिळण्याची शक्यता महाविकास आघाडीला असतानाच नंदेश उमप यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे मते फिरण्याची शक्यता होती.