या प्रकरणी सुधीर चव्हाण (वय ३२, रा. नरसिंहपूर, सोलापूर) या ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाचे पुणे आयुक्त यशोधन वनगे यांनी माध्यमांना दिली.
देशात गांजा विक्रीला बंदी असतानाही, परराज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होते. ओडिशा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पथक सोलापूर ग्रामीण भागात तैनात करण्यात आले. एका ट्रकमधून गांजा राज्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने ट्रक पकडून पाहणी केली असता दोन कोटी २० लाख रुपये किमतीचा ८८३ किलो गांजा सापडला.
लपविण्याचा प्रयत्न केला पण…
त्याचा वास येऊ नये; तसेच कोणाला संशय येऊ नये, यासाठी कोंबड्यांची विष्ठा असलेल्या पोत्यांखाली लपवून गांजाची तस्करी केली जात होती. आरोपी सुधीर चव्हाण हा गांजाचा मालक असून, तोच ओडिशातून ट्रकमधून गांजाची तस्करी करीत होता. ‘एनडीपीएस’ कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली असून, हा गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची विक्री सोलापूर येथे केली जाणार असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याने विभागाने अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. गांजाची तस्करी करण्यासाठी आरोपी सुधीर चव्हाणला कोणी मदत केली, गांजाचे वितरण कोण करणार होते, याचा तपास विभागाकडून केला जात आहे, असेही वनगे यांनी सांगितले.
गांजाचे उत्पादन, खरेदी-विक्री हा गुन्हाच
अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस – एनडीपीएस) कलम २० प्रमाणे गांज्याचे उत्पादन, विक्री, खरेदी, निर्यात, आंतरराज्यीय व्यापार करणे गुन्हा आहे.