लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा चालतो. पण विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टरला मर्यादा येतात. स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी ठरतात. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार राज्यात महायुतीला ३०, तर इंडिया आघाडीला १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे एनडीएच्या ११ जागा कमी होण्याचा अंदाज आहे.
भाजपला २१ आणि शिंदेसेनेला ९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंच्या सेनेला १० जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ४ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी इंडिया आघाडीसाठी चिंताजनक आहे. पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मतं ठाकरेसेनेला मिळत असल्याचं यातून दिसतं. पण ठाकरेंची मतं दोन्ही काँग्रेसला मिळताना दिसत नाहीत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात एनडीएला ५१ टक्के मतं मिळाली होती. ती यंदा ४६ टक्क्यांवर येतील असा अंदाज आहे. यूपीएला २०१९ मध्ये ३२ टक्के मतं मिळाली होती. यंदा ही मतं ४३ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ इंडियाला महाराष्ट्रात महालाभ होताना दिसतोय.
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास एनडीएला ४६ टक्के, तर इंडिया आघाडीला ४३ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. २०१९ मध्ये एकसंध शिवसेनेला २४ टक्के मतं मिळाली होती. यंदा ठाकरेंना २० टक्के आणि शिंदेंना १३ टक्के मतं मिळण्याचा कयास आहे. २०१९ मध्ये शिवसेनेनं २३ जागा लढवल्या होत्या. २०२४ मध्ये दोन्ही गटांनी एकूण ३६ जागा लढवल्या. त्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
पक्ष, चिन्ह गमावूनही उद्धव ठाकरेंनी चांगली लढत दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारी दलित आणि अल्पसंख्याकाची मतं त्यांना मिळाली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला अनुक्रमे ८ टक्के आणि २ टक्के मतांचं नुकसान झालं होतं. तर काँग्रेस, राष्ट्रवादीचं मतदान कायम राहिलं होतं. आताच्या एक्झिट पोलचे आकडे पाहता विधानसभा निवडणुकीचा सामना काँटे की टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज आहे. आघाडी आणि महायुतीसमोर व्होट ट्रान्सफरचं आव्हान असणार आहे.