दादरचे प्राणीसंग्रहालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, कारवाईसाठी मनेका गांधींनी लिहिले CZAला पत्र, असं काय घडलं?

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क येथील खासगी प्राणीसंग्रहालय पुन्हा वादात सापडले आहे. वनविभागाच्या विशेष पथकाने या प्राणीसंग्रहालयातून काही परदेशी प्राणी ताब्यात घेतले आहेत. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) परवानगीशिवाय हे प्राणी प्राणीसंग्रहालयात ठेवल्याचा ठपका ठेवत प्राणीसंग्रहालय मालकाविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री, खासदार मनेका गांधी यांनीही या प्राणीसंग्रहालयाच्या वादात उडी घेतली असून त्यांनी पालिका, सीझेडए आणि वन विभागाला पत्र लिहून प्राणीसंग्रहालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर मार्गावर पालिकेचा जलतरण तलाव असून त्याच्यालगत खासगी प्राणीसंग्रहालय आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जलतरण तलावात मगरीचे पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली होती. पालिकेने आपल्या सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत मगरीचे पिल्लू प्राणीसंग्रहालयाचेच असल्याचे स्पष्ट करत वन खात्याकडे तक्रार केली होती. या पाठोपाठ प्राणीसंग्रहालयातील सहा अवैध बांधकामे पालिकेने पाडली होती. दरम्यान, प्राणीसंग्रहालयाच्या मालकाने चार महिन्यांपूर्वी प्राणीसंग्रहालयातून प्राणी चोरीला गेल्याचा दावा करत गुन्हा नोंदविल्याचे आता समोर आले आहे.

वन खात्याच्या पथकाने मागील आठवड्यात गुरुवारी या प्राणीसंग्रहालयातून एक मऊ कवच असलेले कासव, दोन अर्जेंटाइन ब्लॅक अँड व्हाइट सरडे, एक अजगर (बॉल पायथन) एक आफ्रिकन अजगर आणि एक सामान्य स्नॅपिंग कासव ताब्यात घेतले आहे. परवानगीशिवाय ठेवण्यात आलेले हे प्राणी कसे मिळाले याची कागदपत्रे आणि तपशील प्राणीसंग्रहालय मालकाकडून मागितले आहेत, अशी माहिती वन अधिकारी राकेश भोईर यांनी दिली आहे.

मऊ कवच असलेल्या कासवांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण दिले जाते, तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यातील दुरुस्तीनंतर आता विदेशी प्रजातींनाही संरक्षण मिळाले आहे, ही बाब लक्षात घेऊन प्राणीसंग्रहालयावर कारवाई केली जाऊ शकते. संग्रहालय मालकाला हे प्राणी प्राणी कसे मिळाले, त्यांनी ते डिलरकडून मिळवले की आयात केले याची कागदपत्रे मालकाला द्यावी लागतील, असे या वन अधिकाऱ्याने सांगितले. याबात विचारणा करण्यासाठी प्राणीसंग्रहालयाचे मालक नंदकुमार मोघे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
‘बिबट्याच्या अंगात आला कोणाचा आत्मा?’ अवघ्या ५ सेकंदात पाडला डुकराचा फडशा, थरारक व्हिडीओ व्हायरल
वन्यजीव विभागाकडून अहवाल

‘हे प्राणीसंग्रहालय बेकायदा चालवले जात असून त्यास कोणतीही मान्यता नाही. प्राणी अतिशय वाईट अवस्थेत ठेवले जातात, तसेच त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. प्राणीसंग्रहालयातून अनेक प्राणी चोरीला गेले आहेत. या प्राणीसंग्रहालयाला सीझेडएची मान्यता नाही. या प्रकरणी आम्ही मुख्य वन्यजीव विभागाकडून अहवाल मागवला असून तो लवकरच मिळणे अपेक्षित आहे’, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

वन्यजीव कायद्यानुसार तपासणी

‘प्राणीसंग्रहालयात ठेवलेले प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सूचीबद्ध आहेत की नाही, हे तपासावे लागेल. प्राणी चांगल्या स्थितीत ठेवले आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्राणीकल्याण मंडळाची आहे’, असे सीझेडएचे सदस्य सचिव डॉ. संजय कुमार शुक्ला यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पाठपुरावा करणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करण्याची वारंवार मागणी केली. वनखात्याने थातूरमातूर कारवाई केली. आता तरी मोठी कारवाई होईल असे अपेक्षित आहे, असे सांगितले.