माहिती अधिकार कार्यकर्ते संचल कदम यांनी २०१८मध्ये निविदा क्रमांक २८ नुसार ड्रेनेज साफसफाई आणि दुरुस्ती करणे, २०१५मधील निविदा क्रमांक ४१नुसार येरवडा स्मशानभूमीमधील कामे आणि निविदा, नवीन ड्रेनेज वाहिन्या टाकण्याच्या कामांची माहिती मागवली होती. यावर या कामांच्या फायली कार्यालयातून गहाळ झाल्याचे उत्तर पालिकेने कदम यांना दिले. त्यामुळे कदम अपिलात गेले. तेथेही त्यांना फायली गहाळ झाल्याचे उत्तर देण्यात आले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षेत्रीय कार्यालयाने पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली; पण पोलिसांनी सूचना केल्याप्रमाणे त्यांना ‘लॉस्ट अँड फाउंड’मध्ये तक्रार नोंदवावी लागली. माहिती अधिकार कार्यकर्ते कदम यांनी राज्य माहिती अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यावर पालिकेला विचारणा करण्यात आली. त्यावर पालिकेने पोलिस उपायुक्तांना पत्रव्यवहार करून कार्यालयातून गहाळ फायली शोधून देण्याची विनंती केली आहे; पण अद्याप गहाळ फायलींची शोध लागलेला नाही.
सन २०२२-२३मधील फाइल गहाळ
माहिती अधिकार कार्यकर्ते अकबर खान यांनीही २०२२-२३ मधील निविदा क्रमांक २६१मधील विकासकामाची माहिती मागितली होती. त्या वेळी कनिष्ठ अभियंत्यांनी संबंधित कामाची फाइल गहाळ झाल्याचे उत्तर दिले होते. त्यामुळे माहिती देणे टाळणे आणि कर्तव्यात कसूर केल्याने तत्कालीन कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत झालेल्या विकासकामांची माहिती मागितलेल्या फायली कार्यालयातून गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना पत्रव्यवहार करून फायली शोधून देण्याची विनंती केली आहे.
– चंद्रसेन नागटिळक, प्रभारी सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय