विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडून महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामाना करावा लागला, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारीच शिवसेना ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला होता. शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सचिन कदम कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, मी माझ्या वैयक्तिक करणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, त्यानंतर आता जालन्यातील नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आसाराम बोराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी जालन्यात मोठा धक्का मानला जात असून, या पक्षप्रवेशामुळे जालन्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.
आसाराम बोराडे हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार होते. त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून परतूर, मंठा विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं होतं. आसाराम बोराडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: परतूरमध्ये सभा घेतली होती. मात्र आता आसाराम बोराडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे.