त्वचेची काळजी घेणे हा आपल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. प्रत्येकजण त्वचेची काळजी घेण्यासाठी सोशल मीडियावर सांगण्यात आलेले अनेक उपाय करत असतात. पण काही दिवसांनी त्वचेची चमक निघून जाते. त्यामुळे आता अनेकजण घरगुती उपाय करत असतात. यातच आता आधुनिक बायोटेक्नोलॉजीमार्फत नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने त्वचेसाठी चांगली उत्पादने तयार केली जात आहेत. लोकं केवळ चमकदार त्वचेकडेच नव्हे तर त्वचेच्या आरोग्याकडेही लक्ष देऊ लागले आहेत. हल्ली अनेक ट्रेंड्समध्ये स्किन केअर चा ट्रेंड सुरू आहे.
डॉ. बत्रा क्लिनिकच्या सौंदर्यतज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ वैशाली कामत सांगतात की, निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी महागड्या उत्पादनांची गरज नाही. योग्य स्किनकेअर रूटीन चा अवलंब करून तुम्ही सर्वोत्तम परिणाम मिळवू शकता. कोणत्याही स्किनकेअर रूटीनचे अनुसरण करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की ते तुमच्या त्वचेनुसार असावे.
त्वचेनुसार प्रॉडक्ट निवडा
तुमची त्वचा जर कोरडी असेल तर यासाठी तुम्ही हायड्रेटिंग गुणधर्म असलेली उत्पादने वापरा. जसे की हायल्युरोनिक आम्ल, ग्लिसरीन आणि कोरफडयुक्त प्रॉडक्ट वापरा.
तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेनुसार मॅटिफाइंग उत्पादने निवडा. यामध्ये सॅलिसिलिक आम्ल किंवा ट्री टीच्या तेलाचा समावेश असलेल्या प्रॉडक्टचे वापर करून त्वचा निरोगी ठेऊ शकता.
तुमची त्वचा जर सेंसिटिव असेल तर या त्वचेसाठी फ्रेगरेंस-फ्री आणि सौम्य उत्पादने वापरा. यात कॅमोमाइल किंवा कॅलेंडुला अर्क समाविष्ट असलेले प्रॉडक्ट वापरा.
क्लिंजिंग आणि मॉइश्चरायझर महत्वाचे आहे
त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात प्रथम त्वचा क्लिंजिंग करणे महत्वाचे आहे. क्लिंजिंग केल्याने तुमच्या त्वचेवरील घाण, अतिरिक्त तेल आणि प्रदूषणाचे कण काढून टाकते. यासाठी तुम्ही सौम्य असलेले क्लीन्झर निवडा.तसेच ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार बनवते. त्याचबरोबर त्वचेला नियमित मॉइश्चरायझर करणे देखील गरजेचे आहे. मॉइश्चरायझिंगमुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. यासाठी तुम्ही कोरफड किंवा ऑलिव्ह ऑईलयुक्त प्रॉडक्टचा वापर करू शकता.
एक्सफोलिएशन करा
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचेला एक्सफोलिएट करणे महत्वाचे आहे. यामुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचा पूर्वीपेक्षा अधिक चमकदार होते. ओटमील आणि साखर यासारख्या नैसर्गिक स्क्रबचा वापर करा.
स्वत: ला हायड्रेटेड ठेवा
तुमच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी हायड्रेशन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यावे. तसेच तुमच्या आहारात काकडी, टरबूज आणि नारळ पाणी यासारख्या हायड्रेटिंग पदार्थांचा समावेश करा. तुमची त्वचा केवळ चांगली दिसणार नाही तर आतून निरोगी देखील होईल.
पुरेशी झोप घ्या
निरोगी त्वचेसाठी दररोज 7 ते 9 तास शांत झोप घेणं खूप गरजेचं आहे. झोपे दरम्यान तुमची त्वचा निरोगी होते. यामुळे दैनंदिन थकव्याचा प्रभाव कमी होतो आणि त्वचा ताजी, तजेलदार आणि चमकदार दिसते. कॅल्केरिया फॉस्फोरिकासारखी होमिओपॅथिक औषधे चांगल्या झोपेसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)